no images were found
कोल्हापुरात चोऱ्या करून सोनं विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १४ घरफोड्या उघडकीस
कोल्हापूर : कोल्हापुरात चोऱ्या करून सोने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून १४ घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात केलेल्या घरफोड्या उघडकीस आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
पोलिसांकडून प्रथम दोघांना अटक करण्यात आली. राजू सल्वराज तंगराज (वय३७, रा. कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि भीमगोंडा मारुती पाटील (वय २९, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. लक्ष्मीपुरीतील दुसऱ्या गुन्ह्यातील एकालाही पोलिसांनी अटक केली. श्रीकृष्ण ऊर्फ अमोल संजय अलुगडे (वय २७, रा. भाटशिरगाव, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. या सर्वांकडून एकूण १४ चोऱ्या उघडकीस आल्या आहे. टोळीकडून सुमारे २४ लाख ३२ हजार ६४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे त्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.
चोरीच्या गुन्ह्यांमध्येच बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत असताना गुन्हेगारांची टोळी तयार झाली. जून २०२२ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा घरफोड्यांचे काम सुरू केले. अटक केलेले चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दहा गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती निरीक्षक वाघमोडे यांनी दिली.
अधीक्षक बलकवडे म्हणाले की, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात उपनगरांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्या गुन्ह्यांचा शोध घेताना एका आंतरराज्यीय टोळीने घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. विनायक चौगुले यांनी अधिक माहिती घेऊन १० फेब्रुवारीला चित्रनगरीजवळ राजू तंगराज आणि भीमगोंडा पाटील यांना पकडले. अधिक चौकशीत त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. या टोळीतील आणखी दोघांचा शोध सुरू असून, अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, विनायक चौगुले, प्रकाश पाटील, हरीश पाटील आदींनी ही कारवाई केली.