
no images were found
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता ७ तारखेच्या आत
मुंबई : राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना सवलतीचे २२० कोटी रुपये आणि अतिरिक्त १०० कोटी रुपयांचा निधी सरकार एस टी महामंडळाला महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात येणार आहे. एकूण ३२० कोटी रुपये वेतनासाठी सरकारकडून अग्रीम देण्यात येणार, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या सात तारखेपर्यंत करण्यात येणार आहे. अर्थ, परिवहन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकित असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी ३६० कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्याने महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकित रक्कम मागितली होती. या पार्श्वभूमीवर अर्थ, परिवहन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यासठी हा निर्णय घेतला असून वेतनासाठी ३२० कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीलाच मिळणार आहे. एसटीकडून २९ विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात, ज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पुरस्कार प्राप्त व्यक्तींसारख्या सवलतींचा समावेश आहे.
मात्र अर्थ विभागाकडून एसटी महामंडळाला आधी दिलेल्या रकमेचा हिशोब देण्यास सांगितले आहे. एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. सोबतच महामंडळावर संघटनांकडून कोर्टाच्या अवमानाच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.