no images were found
डी.एम.एन्टरप्राईझेसने उघडयावर जैव वैद्यकीय कचरा टाकल्याने रुपये 50 हजार दंड
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :- छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयामध्ये डी.एम.एन्टरप्राईझेस या कंपनीने उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्याने त्यांना महापालिकेने रुपये 50 हजार दंड केला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता महानगरपालिकेचे आरोग्य पथक छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय परिसरात स्वच्छतेबाबत पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी या पथकाला रुग्णालयाच्या आवारात जैव वैद्यकीय कचरा उघडयावर टाकल्याचे निदर्शनास आले. या रुग्णालयात डी.एम.एन्टरप्राईझेस या कंपनीमार्फत स्वच्छता व कचरा संकलन करण्यात येते. हि कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक मनोज लोट, ऋषीकेष सरनाईक, नंदकुमार पाटील व कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली.
छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयामध्ये साफसफाईचे काम रुग्णालयाने डी.एम.एन्टरप्राईझेस यांना दिले आहे. या ठिकाणी दैनंदिन होणारा कचरा महापालिकेच्यावतीने वेळोवेळी उठाव करण्यात येतो. येथील जैववैद्यकीय कचरा पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 तसेच केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमावली 1998 आणि 2016 मधील तरतुदीनुसार त्यांनी स्वतः व्यवस्थापन संकलन व वाहतूक प्रक्रिया आणि निर्मूलन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियमाप्रमाणे करणेचा आहे.
कोल्हापूर महानगरपालिका आणि मेसेज एस एस सर्विसेस यांचे मध्ये सामुदायिक जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प चालविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयाने रुग्णालयात निर्माण होणारा सर्व जैव वैद्यकीय कचरा कलर कोडींग प्रमाणे वर्गीकरण करून तो बांधून देणेचा आहे. प्रत्येक पिशवीवर कलर कोडींग प्रमाणे बारकोड लावून सर्व बारकोड स्कॅन करून कचरा विघटन करणारी कंपनी एस एस सर्विसेस यांच्याकडे तो नष्ट करण्यासाठी पाठवणे आवश्यक आहे. या जैव वैद्यकीय कच-याची स्वतंत्र रजिस्टरवर नोंदी ठेवणे आवश्यक आहे. रुग्णालयात निर्माण झालेला जैव वैद्यकीय कचरा इतर कोणत्याही स्वरूपातील घनकचरा जसे कागद खरकटे, फळांच्या साली, सॅनिटरी नॅपकिन व इतर यामध्ये मिक्स करणेचा नाही. त्यामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने त्यांचा निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा त्यांनी स्वतःच्या वाहनांद्वारे नेऊन नष्ट करण्यासाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी मेसेज एस एस सर्विसेस यांच्याकडे देण्याचा आहे.
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाने या सर्व कामासाठी त्यांच्या अखत्यारीत पुणे येथील डी.एम. सर्विसेस यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता विभागाने डी.एम. सर्विसेस यांच्या विरुद्ध प्राथमिक कारवाई म्हणून रुपये 50 हजार इतका दंड ठोठावला आहे. यावेळी डी.एम.सर्विसेस यांनी या प्रकरणी त्यांच्या बेशिस्त व बेजबाबदार कर्मचाऱ्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करत असल्याचे सांगितले आहे.