no images were found
वायु प्रदूषण, वातावरणीय बदल मोजणाऱ्या वाहनांचे उदघाटन
कोल्हापूर : हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १५ वाहनांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोल्हापुरात उदघाटन करण्यात आले. वायु प्रदूषण व वातावरणीय बदल मोजण्यासाठी या फिरत्या वाहनाचा खूप फायदा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली.
पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे औपचारिकरित्या उदघाटन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवेची गुणवत्ता तपासणारे १५ वाहनांबद्दल अधिक माहिती देताना नितीन गोरे यांनी सांगितले की, सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून फ्रेंच टेक्नॉलॉजी वापरुन बनवलेली ही सर्व वाहने आहेत. चाकण सारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये वायु प्रदूषण व वातावरणीय बदल मोजण्यासाठी या फिरत्या वाहनाचा खूप फायदा होणार आहे, जानेवारी २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या बोर्ड मीटिंग मध्ये सदर वाहन खरेदीला मंजूरी देण्यात आली होती. सतत वातावरणीय हवा गुणवत्ता फिरते निरीक्षण केंद्र म्हणुन काम करणारे हे वाहन विविध ठिकाणी पोहोचून त्या ठिकाणची हवेची गुणवत्ता मापन लवकरात लवकर करण्यास उपयोगी पडणार आहे. तसेच त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य उपाययोजना करता येणार आहेत. लवकरच चाकण औद्योगिक वसहतीमध्ये या वाहनाचे डेमो आयोजित करणार आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.