no images were found
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्पासाठी आदेश : कोकणवासीयांच्या आशा पल्लवित
रत्नागिरी : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवण्याचे आदेश निघाले आहेत. हा प्रकल्प पीएम गतीशक्तीमधून घेण्यात आला असल्यामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. ३४११.१७ कोटींचा वैभववाडी- कोल्हापूर प्रस्तावित रेल्वे मार्ग पंतप्रधान गतीशक्ती योजनेखाली घेतल्यामुळे प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, अशी महिती नॅशनल प्लॅनिंग ग्रुपचे सेक्रेटरी सुमित डावरा यांनी दिली.
या मार्गावरील उतारामुळे लांबी २८ किमीने वाढण्याची शक्यता आहे. खरं पाहता, सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना ५० कोटीची तरतूद झाली होती. अर्थात, रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरीचा प्रतिक्षेत प्रकल्प आहे, अशी माहितीही ॲड. पाटणे यांनी दिली. कोकणचा चेहरामोहरा बदलवून टाकणाऱ्या वैभववाडी कोल्हापूर या १०७.६५ कि. मी. लांबीच्या प्रकल्पाला केंद्र सरकार कधी मंजुरी देणार, हा प्रश्न कोकणवासीयांना पडला होता. या रेल्वेमार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन व वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे.
या मार्गावर वैभववाडी, उंबार्ड, उपाले, गगनबावडा रोड, माडूळ, मल्हारपेठ, खुपिरे, रजपुतवाडी, वळीवडे, गूळ मार्केट, कोल्हापूर ही स्टेशन्स व २७ बोगदे आणि २५ पूल प्रस्तावित आहेत. ७० वळणांमधून १० स्टेशने पार करत ११० किमी वेगाने रेल्वे कोल्हापूरला पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे अॅड. पाटणे म्हणाले.