no images were found
बोगस ए.एस. ट्रेडर्स कंपनीचा संचालक विक्रम नाळेला अटक
कोल्हापूर : दामदुप्पट कमाईची भुरळ घालून लाखांवर गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या वादग्रस्त ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा संचालक विक्रम जोतिराम नाळे (वय 35, रा.सांगरुळ, ता. करवीर) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोहितसिंग सुभेदारसह संचालक व एजंट अशा 27 जणांविरोधात 25 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सर्वच संशयित कोल्हापूर येथून पसार झाले होते. संशयित नाळे ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा म्होरक्या मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदार याचा विश्वासू साथीदार आहे.
वादग्रस्त ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंट कंपनीशी संलग्न ट्रेडिंग विंग्ज सोल्युशन्स या कंपनीचे विक्रम नाळेसह संतोष नंदकुमार कुंभार, बाबुराव कृष्णा हजारे, रवींद्र प्रदीपराव देसाई हे संचालक म्हणून काम पाहात होते. मूळ मुद्दल आणि परताव्यांसाठी तगादा वाढल्याने संशयित कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले होते.
संशयित नाळे फरारी काळात कोठे आश्रयाला होता, म्होरक्या लोहितसिंग सुभेदारसह अन्य फरारी संचालक व एजंटाच्या संपर्कात होता का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. नाळेसह त्याचे कुटुंबीय व विश्वासातील मंडळींच्या बँक खात्यातील उलाढालीसह अलीकडच्या काळात झालेल्या मालमत्तांच्या व्यवहारांचा तपशील तपासण्यात असून मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदारसह 26 संशयित पसार आहेत. मुख्य संशयिताला अटक करण्यासाठी मुंबई, दिल्लीसह अन्य शहरातील पोलिस यंत्रणांची मदत घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी सांगितले.