no images were found
जादा परताव्याचे आमिष; पिनॉमिक कंपनीवर ३ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
सांगली : पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीच्या संचालकांवर आतापर्यंत २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल असताना शेअर मार्केटद्वारे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून २ कोटी ८४ लाख ५० हजारांना गंडा घालण्यात आल्याचा अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पंकज पाटील, अभिजित जाधव, संतोष घोडके या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर विपुल प्रकाश पाटील याच्यासह अन्य दोघे अद्याप पसार आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
जिल्ह्यासह अन्य भागात पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवत पैसे घेतले होते. हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून दहा महिन्यांत दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
सांगली शहरातील एका व्यापाऱ्याने जुलै ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम या कंपनीत जादा परताव्याच्या अपेक्षेने गुंतवली होती. दहा महिन्यांनंतर दीडपट रक्कम व टीडीएस नको असल्यास रोखीने पैसे देणार असल्याचेही संशयितांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यानंतर रविवारी कंपनीच्या संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात तीन संशयितांना ताब्यात घेतले. सर्वांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर कंपनीचा संचालक विपुल पाटीलसह अन्य अद्यापही पसार आहेत.
पिनॉमिक व्हेंचर अँड एलएलपी या कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अजूनही कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.