no images were found
केंद्र सरकारकडून जम्मू-कश्मीरमध्ये लोकशाही हक्कांवर गदा : राहुल गांधी
जम्मू : जम्मू-कश्मीरच्या लोकांची इच्छा नसताना केंद्र सरकारने जम्मू आणि कश्मीर असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले. आता केंद्र सरकार लोकशाही मार्गाने मिळालेले हक्कही हिरावून घेत आहे. स्वतःचे राजकीय अपयश झाकण्यासाठी आणि खऱ्या समस्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी सध्या गुलमर्गमध्ये खासगी दौऱ्यावर असून लोकांशी संवादही साधत आहेत. राहुल गांधी यांची आज काँग्रेसच्या जम्मू-कश्मीरमधील नेत्यांबरोबर बैठक झाली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली. चुकीची धोरणे आणि राजकीय अपयश झाकण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता लोकांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे तसेच पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी तुम्ही दडवू नका, असे आवाहन केले.
काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, लोकांचा पक्ष आहे. समाजाच्या कल्याणासाठी झटणारा हा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसकडे तरुणांचा जास्त ओढा आहे. पक्षाची दारे सर्वांसाठी उघडी असून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे नेहमीच स्वागत केले जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले