
no images were found
विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे : विकास खारगे
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा द्यावी. आपल्याला गुणवत्तेच्या आधारे पास व्हावयाचे आहे. आपल्या भावी जीवनाचा पाया इयत्ता दहावी आहे, तो मजबूत करा. प्रामाणिकपणे परीक्षा द्या. मनन, पठण, चिंतन करुन अभ्यास करा, असे महत्वपूर्ण मार्गदर्शन प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले
मूळचे इचलकरंजीचे असलेले, तेथील नगरपालिकेच्या शाळेतच शिकून आता मंत्रालयात राज्याचे प्रधान सचिव पदावर कार्यरत असलेले विकास खारगे सुमंगलम महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आवर्जून इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलला भेट दिली आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. खारगे म्हणाले, परीक्षेच्या शिल्लक दिवसाचे नियोजन करा. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास केला तर चांगले मार्क मिळू शकतात. टीव्ही, चित्रपट पाहू नका. प्रश्नपत्रिकांचा सराव करा. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाताना तणाव मुक्त परीक्षा द्या. परीक्षेचा आनंद घ्या. प्रश्न वाचून त्याचे उत्तर लिहा. सर्व प्रश्न वेळेत सोडवा. सर्व विषयांचा सराव करा. जास्त जागरण करु नका, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
दहावी परीक्षा निकाल लागल्यानंतर पुढे काय करणार आहात सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ,डिप्लोमा की अन्य क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात प्रवेश घ्या. आम्ही इचलकरंजीकर, इचलकरंजी महानगरपालिका, माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत असे श्री खारगे यांनी सांगून महापालिकेचे विद्यार्थी काही अभ्यासात कमी नाहीत. आपण आयुष्यामध्ये पुढे जावे यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत,
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले. यामध्ये त्यांनी शालेय उपक्रमाची माहिती दिली. प्रधान सचिव श्री. खारगे यांना ‘शाहूंच्या आठवणी’ हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आम्ही इचलकरंजीकर ग्रुपचे अध्यक्ष उल्हास पुजारी, सोमनाथ रसाळ, विद्यानिकेतनच्या अलका शेलार उपस्थित होते. सर्व शिक्षकवृंद व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.