
no images were found
चिंचवड मतदारसंघात आचारसंहिता कक्षाकडून कारवाईचा धडाका
पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे खबरदारी घेतली जात आहे. आचारसंहिता कक्षाने कारावईचा धडाका लावला आहे. आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील २७५ पोस्टर, १७४ बॅनर्स, ३ हजार ७२४ झेंडे आणि फलकांसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी विविध पथकांमार्फत प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पथक प्रमुखांना दिले आहेत. त्यांच्या आदेशाने शहरात सगळीकडे बारीक लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिलेल्या माहिती नुसार उमेदवारांच्या सुविधेसाठी कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत १६ फेब्रुवारी पर्यंत ९ सभांना परवाने देण्यात आले आहेत. तर १८ रॅली आणि मिरवणुका, ९५ वाहन परवाने, ११ तात्पुरते पक्ष कार्यालय परवाने आणि ३३ जाहिरात फलक परवाने देण्यात आले आहेत. सी-व्हिजील ॲपवर एकूण १२ तक्रारी प्राप्त झाल्या असून तक्रार निवारण कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे.
सी-व्हिजील’ ॲपवर मतदारसंघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात
याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचं निरसन करण्यात आलं आहे. त्यामुळे या अॅपचा वापर करा आणि कोणत्याही परिसरात काही अनुचित प्रकार सुरु असेल तर लगेच तक्रार करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे