no images were found
कुंभी कासारी साखर कारखान्यावर चंद्रदीप नरके यांचा चौथ्यांदा झेंडा
कोल्हापूर : कुडीत्रे तालुका करवीर येथील कुंभी कासारी सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या सत्तारूढ आघाडीने चौथ्यांदा बाजी मारत सर्व 23 जागेवर मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला. आ. पी एन पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने निवडणुकीत चिवट झुंज दिली तरीही त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. यानिमित्ताने माजी आमदार चंद्रदीप नरके आणि त्यांचे बंधू अजित नरके यांच नेतृत्व, योग्य नियोजन आणि सभासदांचा विश्वास यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पारंपारिक नरके गटविरुद्ध आ. पी एन पाटील गट अशी झाली असली चंद्रदीप नरके यांचे चुलते गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके आणि चुलत बंधू डॉ. चेतन नरके यांच्या रूपाने नरके घराण्यात झालेली दुफळी, पी एन पाटील यांना आमदार विनय कोरे यांनी दिलेला पाठिंबा, यामुळे चंद्रदीप नरके यांच्या एकाकी लढतीला केवळ आमदार सतेज पाटील यांची मिळालेली साथ तसेच कारखान्यातील कारभार, या मुद्द्यावर जय-पराजयाचे पडसाद उमटले.
चंद्रदीप नरके यांच्या ताब्यातील साखर कारखाना काढून घेण्यासाठी आ.पी. एन. पाटील, आ.विनय कोरे यांनी ताकद पणाला लावली. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके व चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केला. तरीही चंद्रदीप नरके यांच्याकडे सत्ता कायम राहिली. चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई सोपी झाली. ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी गेला महिनाभर केलेल्या पडद्यामागील जोडण्याही यशाला कारणीभूत ठरल्या.
‘कुंभी’साठी रविवारी अत्यंत चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व गगनबावडा अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. गेले पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने निकालाबाबत कमालीची उत्कंठा होती. मंगळवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात ३५ टेबलांवर मोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत विरोधी शाहू आघाडीने आघाडी घेतली होती.
मात्र, दुसऱ्या फेरीत नरके पॅनलने जोरदार मुसंडी मारत ‘शाहू’ आघाडीचे मताधिक्य कमी करीत, त्यांच्यावर सरासरी ४०० ते ५०० चे मताधिक्य राखत पन्हाळा तालुक्यात प्रवेश केला. तिसऱ्या फेरीतही नरके पॅनलने मताधिक्य कायम ठेवले.
पहिल्या फेरीत कुडित्रे, वाकरे, काेपार्डे, कळंबे तर्फ ठाणे, भामटे, चिंचवडे, सांगरुळ, म्हारुळ, आमशी, खाटांगळे, पासार्डे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला या गावांतील मोजणी करण्यात आली. यामध्ये विरोधी शाहू आघाडीचे २१ उमेदवार आघाडीवर राहिले. सत्तारूढ आघाडीचे चंद्रदीप नरके व कृष्णात कांबळे यांनी आघाडी घेतली.
दुसऱ्या फेरीअखेर नरके पॅनलने मुसंडी मारली असली तरी विरोधी आघाडीचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी गट क्रमांक २ मध्ये मताधिक्य कायम राखले होते. कार्यक्षेत्रातील त्यांचा संपर्क व कोरोना काळातील काम सभासदांनी लक्षात ठेवल्याने सूर्यवंशी यांनी चांगली मते घेतली. यामुळे नरके पॅनलचे सर्जेराव हुजरे हे अडचणीत आले होते. मात्र, तिसऱ्या फेरीत त्यांचे मताधिक्य कमी होत जाऊन हुजरे विजयी झाले.
निकालानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर व सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.
सकाळी सात वाजता सुरु झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण जाणवत होता. तरीही निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक प्रदीप मालगावे यांनी नेटके नियोजन केल्याने विनातक्रार मोजणीची प्रक्रिया पार पडली. पहिली फेरी पूर्ण होण्यास तब्बल नऊ तास लागले. नऊ मतपत्रिका आणि क्रॉस व्होटिंगमुळे मोजणीला विलंब लागत होता. त्यानंतर मात्र दुसरी व तिसरी फेरी गतीने पूर्ण झाली.
.