no images were found
महावितरणच्या ‘गो ग्रीन’ सेवेतून ग्राहकांची २६ लाखांची बचत
कोल्हापूर : “कागद वाचवा-पैसेही वाचवा” महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीजबिलाऐवजी नोंदणीकृत ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. गो ग्रीन द्वारे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २१ हजार ८९५ वीज ग्राहक वार्षिक २६ लाख २७ हजार ४०० रुपयांची आर्थिक बचत करीत आहेत.
गो ग्रीन सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना दरमहा वीज बिलात १० रुपयांची सवलत दिली जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील १३ हजार २७३ तर सांगलीच्या ८ हजार ६६२ वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी केली आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकास दरमहा १० रुपये सवलतीप्रमाणे एका ग्राहकाचे वार्षिक १२० रुपये बचत होतात. वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेकरिता नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील लिंकचा वापर करावा. लिंकवर आपल्या वीज ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट आधारे ई-मेल आयडी व छापिल वीज बिलाच्या डाव्या कोपऱ्यात चौकटीत दिलेला १५ अंकी बिल नं/गो ग्रीन क्रमांक (जीजीएन) नोंदवून सेवेची निवड करावी. त्यानंतर गो ग्रीन सेवा नोंदणी पूर्ण करण्यासाठी आपल्या ई- मेलवर आलेल्या लिंकवर खात्री करा. वीजग्राहक नजीकच्या महावितरण कार्यालयात जाऊन गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करू शकतात.