no images were found
कागलमध्ये शिवजयंतीला भगवे वादळ येईल : आ. मुश्रीफ
कागल :कागलमध्ये शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करूया. शिवजयंतीदिवशी कागलमध्ये भगवे वादळ येईल, असा विश्वास आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये रविवार दि. १९ रोजी शिवजयंती संदर्भात आयोजित नियोजनाच्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.
रविवार दि. १९ रोजी शिवजयंती दिवशी निपाणी वेस येथे शिवज्योतीचे आगमन व स्वागत, मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणुकीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुतळ्याला जल- दुग्धाभिषेक, नगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन, गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि इतिहास प्रसारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा सत्कार. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकांच्या २५ हजार प्रतींचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बस स्टॅन्डजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात भव्य- दिव्य असा विद्युत रोषणाईचा स्टॅंडिंग लाईट लेसर शो असे कार्यक्रम होणार आहेत.
रविवारी दि. १९ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवजयंती रयत लोकोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची “न भूतो न भविष्यती” अशी उपस्थिती लाभेल. त्यादिवशी कागल शहरात अक्षरशा भगवे वादळ येईल आणि डोळ्याचं पारणं फिटेल, असेही ते म्हणाले.
बैठकीला गोकूळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष विकास पाटील, आदी उपस्थित होते.