no images were found
राज्यात 500 ठिकाणी’आपला दवाखाना’: मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार राज्यात तब्बल 500 ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात 366 ठिकाणी रक्तदान शिबिर, 1800 शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक असे अभियान एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी होत असून, हा आरोग्याचा महायज्ञ आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आली आहेत. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू होणार आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलच, सोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील. याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल. यापुढेही सामान्य माणसाची आरोग्यसेवा अशाप्रकारे होत राहील आणि आपला महाराष्ट्र समृद्ध आणि निरोगी राहील, अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.