no images were found
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ जाहीर करा–हेमंत पाटील
मुंबई :
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे.या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक विकासकामांचा वेग मंदावला आहे. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ जाहीर करा,अशी मागणी करीत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.यासंदर्भात त्यांनी आयोगाला पत्र पाठवले असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.
महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका मागील काही महिन्यांपासून जाहीर झालेल्या नाहीत.विविध कारणे देत आयोगाने या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. आयोगाच्या घटनेनुसार अशाप्रकारे निवडणुका सहा महिन्यांहून अधिक काळापर्यंत पुढे ढकलता येत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी अशाप्रकारची दिरंगाई यापूर्वी कधीच दिसून आली नाही.
निवडणुका लांबल्याने लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य मतदारांनादेखील मनस्ताप सहन करावा लागत आहे.स्थानिक विकास कार्यांचा वेग मंदावला आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकप्रतिनिधींच्या सहभागाशिवाय अशक्यप्राय आहे. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरळीत पार पडल्या आहेत. आता आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्यात, अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली आहे.