no images were found
आयकर विभागाची फसवणूक, नौदलाच्या १८ कर्मचाऱ्यांसह ३१ जणांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल
कन्नूर : आयकर विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी केरळमधील कन्नूर इथे केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने भारतीय नौदलाच्या १८ कर्मचार्यांचसह ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये केरळ पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. सुमारे ४४ लाख रुपयांपेक्षा जास्त आयकराचे खोटे रिफंड क्लेम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आयकराचे खोटे रिफंड क्लेमचे दावे करण्यासाठी नौदलाच्या कर्मचाऱ्यांसह, पोलीस कर्मचारी आणि दोन खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एजंट आयकर रिफंडातील १० टक्के वाटा शुल्क म्हणून घेत होते. सीबीआयची ही कारवाई केरळचे मुख्य आयकर आयुक्त टी एम सुगंथामाला यांच्या तक्रारीवरुन करण्यात आली आहे. कन्नूरमधील अनेक नोकरदार व्यक्ती २०१६-१७ पासून बोगस रिफंडचा दावा करत आहेत. काही एजंट त्यांच्यापैकी काहींसाठी १० टक्के परतावा रक्कम फी म्हणून जमा करुन आयकर रिटर्न भरत आहेत.
हे लोक फॉर्म-16 मध्ये समाविष्ट नसलेल्या विविध बोगस परताव्याचा दावा करत होते. मात्र, त्यांनी केलेले दावे चुकीचे आहेत. आयुक्त टी एम सुगंथामाला यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ५१ पगारदार लोकांनी काही विशिष्ट एजंटांच्या संगनमताने आयकर परताव्याचा खोटा दावा केला आहे. ५१ करनिर्धारकांपैकी, ज्यांना आयकर परतावा मिळाला होता अशा २० व्यक्तींनी त्यांना नोटीस बजावल्यानंतर विभागाला २४.६२ लाख रुपये परत केले आहेत.