no images were found
कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून स्टॉपवरील चोऱ्यांचा लावला छडा; २२ वर्षांच्या तरुणीस अटक
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये सध्या बस स्टॉपवर होणार्या चोरीच्या प्रकरणांत खूपच वाढ झाली होती. खूप गर्दी असलेल्या बसमध्ये चढून गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या पर्समधील पैशांवर आणि दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीस पकडण्यात लक्ष्मीपुरी पोलीसांना यश आले. या तरुणीचे नाव प्रज्ञा उर्फ प्रतीक्षा दगडू निंबाळकर (वय २२) असे असून तिच्याजवळून चोरीतील दागिने आणि रोकड असा एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गेल्या काही महिन्यांपासून शहरात केएमटी बसमध्ये चढताना पर्सचोरी होण्याच्या घटनांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ झाली होती; नागरिक यामुळे हैराण झाले होते. सदर गुन्हे करण्याऱ्यांवर कारवाई करत गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले होते. आदेशानुसार अशा घटना रोखण्यासाठी आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांची संशयितांवर सतत नजर होती.
याच दरम्यान छत्रपती शिवाजी चौकातील बस स्टॉपवर प्रज्ञा उर्फ प्रतीक्षा निंबाळकर या संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने पर्सचोरीची कबुली दिली. याबाबत आणखी चौकशी केली असता सदर संशयताने एकूण सहा चोऱ्या केल्या असल्याचे उघड झाले असून सदर संशयताकडून ८८,९५० रोख रक्कम आणि नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १,१९,०५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.