
no images were found
रविवारी पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन
पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक हिंदू संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. रविवारी पुण्यातील लाल महाल या ठिकाणी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर व्हावा ही मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे.
पुणे : सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी (२२ जानेवारी )हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’चे महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेस ‘हिंदू गर्जना प्रतिष्ठान’चे धीरज घाटे, ‘श्रीशंभूचरित्रा’चे अभ्यासक निलेश भिसे, ’मातृशक्ती’च्या नलिनी वायाळ, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, ‘पतितपावन’ संघटनेचे स्वप्निल नाईक, ‘शिवसमर्थ प्रतिष्ठान’चे दीपक नागपुरे, ‘शिवप्रतिष्ठान’चे संजय पासलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मोर्चाची एक महिन्यापासून तयारी सुरू असून शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चामध्ये महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. तेलंगणचे आमदार राजा भैया, संत तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचाही सहभाग असणार असल्याची माहिती यावेळी पवळे यांनी दिली.
‘धर्मांतर, गोहत्या आणि ’लव्ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे भिसे म्हणाले. रविवारी सकाळी १०.०० वा. लाल महाल येथून या मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ येईल.