no images were found
पुणे विभागात 50 लाख घरावर फडकणार तिरंगा-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे 50 लाख घरांवर तिरंगा फडकविला जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त (विकास) विजय मुळीक, उपसंचालक माहिती डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, सहायक आयुक्त डॉ. सीमा जगताप, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे डॉ. किरण मोघे उपस्थित होते.
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एका ठिकाणी 75 फूट झेंडा फडकविला जाण्याचे नियोजन आहे. यात पुणे शहरात शनिवार वाडा व शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राऊंडमध्ये हा झेंडा फडकविला जाईल. त्याचप्रमाणे विभागात सर्वत्र वातावरण निर्मितीसाठी देशभक्तीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये पथनाट्य, लघूपट, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, साहसी खेळ, मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला, प्रभात फेऱ्या आदी कार्यक्रमांचा समावेश आहे, असेही श्री. राव यांनी सांगितले.