no images were found
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्रातील वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दणका दिला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आठ सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वरुड आणि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, यवतमाळ यांना नो युवर कस्टमर (KYC) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. तर कर्जाशी संबंधित काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी नियमावली घालून दिली आहे. या नियमांचे कसोशिने पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाईचा फास आवळल्या जातो. या बँकांना हलगर्जपणा नडतो अथवा मुद्दामहून केलेल्या चुका ही नडतात. अनेकदा बँकांचे व्यवहार सहा महिन्यांसाठी गोठवण्यात येतात. ग्राहकांना ठराविक रक्कमेच्यावरती रक्कम काढण्यास मनाई केली जाते. यामुळे बँकिंग प्रणालीत पारदर्शकता राहते आणि बँकांना मनमानी कारभार करता येत नाही.