no images were found
समरजितसिंह घाटगे सोमय्यांच्या शासकीय विश्रामगृहात भेटीला; दोघांमध्ये चर्चा
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये ईडी कारवाईवरुन खणाखणी सुरु असतानाच किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा केला. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. दरम्यान, यावेळी समरजिंतसिंह घाटगे आणि किरीट सोमय्या यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली.
कागल तालुक्यात राजकारण चांगलेच पेटले आहे. मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी रंगल्या आहेत. ईडीच्या कारवाईनंतर अवघ्या पाच दिवसांत सोमय्या यांनी कोल्हापुरात येत मुश्रीफांवर पुन्हा हल्ला चढवला. ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ यांच्या खात्यात कसे जमा झाले? याची माहिती एकदा कोल्हापूरकरांना द्या, अशी मागणी केली. सोमय्या यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मुश्रीफांवर हल्ला चढवल्यानंतर पुन्हा एकदा या वादामध्ये नव्याने फोडणी मिळाली आहे.
ही परिस्थिती एका बाजूला असतानाच समरजितसिंह घाटगे आणि किरीट सोमय्या यांची भेट झाली. उभयंतांमध्ये जवळपास अर्धा तास भेट झाली. मात्र, भेटीचा तपशील समजू शकला नाही. हसन मुश्रीफ यांनी ईडी कारवाईमागे समरजितसिंह घाटगे असल्याचे म्हटले होते. मागील आठवड्यात बुधवारी ईडी कारवाई सुरु असतानाच त्यांनी एक व्हिडीओ रिलीज करताना म्हटले होते की, कागलमधील भाजप नेता गेल्या चार दिवसांपासून ईडी कारवाई करण्यासाठी दिल्ली वाऱ्या करत होते. त्यामुळे या कारवाईमध्ये कोण आहे याचा अंदाज येतो. यानंतर घाटगे यांनीही पत्रकार परिषद घेत मुश्रीफांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.