no images were found
पावसाचा जोर पुन्हा वाढला, पंचगंगा काठच्या गावांना इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३% भरला असून धरणांतून १६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. आज जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने राधानगरी धरणात मोठ्या प्रमाणत पाण्याची आवक सुरू असल्याने धरण १०० % भरल्यास आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे.
आज सकाळी ८ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३६ फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी आपली इशारा पातळी गाठण्यासाठी ३ फूट कमी आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाली असून प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.