no images were found
हॉकी वर्ल्डकपमध्ये भारताची विजयी सलामी, स्पेनचा २-० नं केला पराभव
भारतीय हॉकी संघाने ओडिशाच्या रुरकेला मधील बिरसा मुंडा स्टेडियमवर एफआयएच विश्वकप स्पर्धेची सुरुवात रंजक केली. भारताचा पहिला सामना स्पेनविरोधात होता. स्पेनचा भारतानं २-० असा पराभव करुन विजयी सुरुवात केली आहे. भारतीय हॉकी संघाला गेल्या ४८ वर्षांपासून विश्वकप जिंकता आलेला नाही. भारतीय संघाचा ड गटात सर्वोच्च स्थानावर राहून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न आहे.
भारतीय हॉकी संघाचा प्रमुख खेळाडू अमित रोहिदासनं १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये केलं. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम समजल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा स्टेडियमवरील हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताकडून दुसरा गोल २६ व्या मिनिटाला हार्दिक सिंह याच्याकडून केला गेला. संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व राहिलं. परंतु, भारताला ४ पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. कॅप्टन हरमनप्रीत सिंहला पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले तर, गोलकीपर कृशन बहादूर पाठकने चांगल्या प्रकारे बचाव केला. स्पेनला ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले होते पण त्यांनाही त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताकडून आक्रमक खेळी खेळली गेली. त्यामुळं ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले त्यापैकी दुसऱ्या कॉर्नरवर अमित रोहितास याने गोल केला. दुसऱ्या क्वार्रटरवर देखील भारताचं वर्चस्व राहिलं.