
no images were found
स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर : गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4Y SRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोंबर या चार अर्हता तारखा यांसाठी प्रसार व प्रचार करावा, तसेच अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरित्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्याच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेश देखील दिले जातात. याच धर्तीवर ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार या स्पर्धेसाठी फोटो आणि ध्वनिचित्रफीत हे साहित्य पाठवायचे आहे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागरिकांगचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून, तर घरगुती पातळीवर गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर देखावा सजावटीतून जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://ceo.maharashtra.gov.in/) आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आली आहे.