no images were found
शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
कोल्हापूर: मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून देणारे साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते वि.स. खांडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, वि.स. खांडेकर यांच्या स्मृती विद्यापीठाने या संग्रहालयाच्या स्वरुपात जतन केल्या आहेत. या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षात नागरिकांनी या संग्रहालयामध्ये येऊन प्रेरणा घ्यायला हवी. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचे प्रेरणास्रोत आहे. विविध आधुनिक माध्यमांतून वि.स.खांडेकर यांची साहित्यसंपदा तथा कार्य अधिकधिक लोकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इंग्रजी विभागाचे दिपक भादले, हिंदी विभागाचे हेमंत जाधव तसेच कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.