no images were found
सकल जैन समाजाचा विराट मूकमोर्चा
कोल्हापूर : जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात सकल जैन समाजाने विराट मूकमोर्चा काढला. या मोर्चाने जैन समाजाने “आपण सगळे एक होऊ या -शिखरजी वाचवू या” आवाज बुलंद केला. “केंद्र सरकार होश में आओ- अपना आदेश वापस लो”असा इशारा दिला.
“सम्मेद शिखरजी पवित्र स्थळ है, पर्यटन स्थळ नही बनेगा” असा निर्धार जैन समाजाने मोर्चातून दाखवून दिला. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहराच्या विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. नजर जाईल तिथपर्यंत आंदोलनात सहभागी झालेले नागरिक नजरेस पडत होते. या मोर्चाच्या निमित्ताने जैन समाजाने संघटित शक्ती दाखवून दिली. “सम्मेद शिखरजी जैनांच्या हक्काचे – नाही कोणाच्या बापाचे” असा इशाराही या मोर्चाद्वारे दिला. हातात जैन समाजाचा पंचरंगी झेंडा, डोक्यावर शिखरजी बचाव असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करत जैन समाज सहभागी झाला. महिलांची संख्या प्रचंड होती. जैन समाज सहकुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झाला. “केंद्रीय वन मंत्रालय शुद्धीवर या- पर्यटन स्थळ नोटिफिकेशन रद्द करा”हा फलक उंचावत जैन समाजाने भावना व्यक्त केल्या.
विराट संख्येने निघालेल्या सकल जैन समाजाच्या मूक मोर्चाने कोल्हापूरवासियांना मराठा क्रांती मोर्चाची आठवण झाली.
दसरा चौक”जैन येथे सकाळपासूनच जैन समाजातील नागरिक एकवटले होते. सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. “जैन धर्म की जान है शिखर सम्मेद महान है, सब जैनोंका नंदन- सम्मेद शिखरजी को वंदन, सब जैनोंका नारा है-शिखरजी हमारा है, आपण सगळे एक होऊ या -शिखरजी वाचवू या, सरकार को जगाओ-शिखरजी बचाओ, श्री सम्मेद शिखरजी तीर्थ बचाओ, श्री सम्मेद शिखरजी पवित्र स्थळ- पर्यटन स्थळ नही बनेगी, आन-बान-शान, शिखरजी हमारी पहचान”या आशयाचे फलक नागरिकांच्या हाती होते. दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक गुजरी, महाद्वार रोड पापाची तिकटी, महापालिका चौक, सी पी आर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.