
no images were found
ऐतिहासिक विजयस्तंभाला २०५व्या शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भीमा – कोरेगाव येथे लोटला जनसागर
पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला २०५व्या शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी रविवारी अनुयायांनी गर्दी केली होती. करोना व अन्य कोणतेही निर्बंध नसल्याने नगर रस्ता दिवसभर गर्दीने फुलून गेला होता. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी रविवारी दिवसभरात केंद्रीय मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मान्यवर; तसेच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार अशोक पवार, आमदार प्रकाश गजभिये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, सचिन खरात, चंद्रशेखर आझाद आदींनी विजयस्तंभाला अभिवादन केले. भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ व रिपब्लिकन सेनेसह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले. कोरेगावचे सरपंच अमोल गव्हाणे, पेरणे गावाच्या सरपंच उषा वाळके व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, बार्टी आदी संस्थांनी कार्यक्रमासाठी चोख नियोजन केले होते. रात्री बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी समता सैनिक दल आणि लष्कराच्या महार रेजिमेंटच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बी. ए. सोळंकी, सहायक आयुक्त संगीता डावखर आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.