no images were found
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआयमध्ये : ना.चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना प्रगतशील करण्याचे काम सरकार करत आहे.शहरातील सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या तर लोकांचे स्थलांतर थांबेल आणि शेतीची प्रगती होईल.शिवाय एआय ही जादू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता एआय मध्ये असल्याचे उद्गार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभप्रसंगी काढले.
यावेळी बोलताना ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडक यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ उभे केल्याचे सांगितले.केंद्र व राज्य सरकार शेतीच्या विकासासाठी काय करत हे भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले असून ज्या पद्धतीने ऊसापासून साखर निर्माण करण्यासाठी साखर कारखाने ४० वर्षापूर्वी सुरू झाले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठीही वेगवेगळी सुविधा गाव पातळीवर सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी बोलताना खासदार धनंजय महाडिक दरवर्षी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवतात आणि नवनवीन माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात या प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकरी घेतात. मात्र शेतकऱ्यांनी याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादनावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आज शेतकरी मातीचे परीक्षण करत नाहीत त्यामुळे पिकांना याचा फटका बसतो तर शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचे आहे. अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा आहे याठिकाणी ऊस पिक मोठ्या पद्धतीने घेतले जाते शेतकऱ्यांनी इतरही पिके घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रास्ताविकपर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केलेल्या टिपू सुलतान बद्दलच्या वक्तव्याचा ही खरपूस समाचार घेतला.आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याशी इथले स्थानिक नेते काँग्रेसचे नेते आणि खासदार सहमत आहेत का याचं त्यांनी जाहीर रित्या उत्तर द्याव असे आव्हान ही खासदार महाडिक यांनी यावेळी दिले. आणि जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतीसाठी विविध योजना आणल्या जात आहेत किसान योजना आहे याचा १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. साडेचार लाख करोड रुपये या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले गेले आहेत असे सांगितले अनेक योजनांच्या माध्यमातून २७ प्रकारचे व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोअरेजसाठी ९० टक्के सबसिडी दिली गेली आहे त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.गेली १८ वर्ष भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिली जात आहे. परिपूर्ण असे प्रदर्शन भरविले जात आहे. कृषी प्रदर्शनात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती असे सांगितले.
समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती होती.त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आ.अशोकराव माने,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची उपस्थिती होती.यावेळी आभार पृथ्वीराज महाडिक यांनी मानले.
मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या चारही दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांसह शेतकऱ्यांचा आणि लोकांचा झाला होता गर्दीचा उच्चांक. पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी प्रचंड गर्दी चार दिवस केली होती.शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे आकर्षण ठरले.
चार दिवसात शेती साठी आवश्यक साहित्याची नोंदणी व खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.याचबरोबर शेती साहित्य,बी.बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे.
चार दिवसात सुमारे १५ कोटींची उलाढाल ही झाली.तर तिला बचत गटाच्या माध्यमातून २५ लाखाची उलाढाल झाली. बेगम राजू मुजावर यांनी बिर्याणी मधून १ लाख १० हजार रुपये विक्री केली, अमृता उमेश भोकरे यांनी १ लाख रुपयाचे मासे विकले तर ज्योती धावडे यांनी ५४ हजार ७०० रुपयांची विक्री केली. कल्याणी भिमगोंडा यांनी ४२ हजार रुपयांचे वस्तू विकल्या. या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. तर प्रगतशील शेतकरी सर्जेराव धनवडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.