
no images were found
MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा
*पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्सची आघाडी कायम गतविजेती नागपूरची दिव्या देशमुख द्वितीय स्थानावर
अतिग्रें-रूकडी :- संजय घोडावत युनिव्हर्सिटी,अतिग्रे-रुकडी, ता.हातकणंगले येथे चालू असलेल्या MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीनंतर चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डची मेरी अना गोम्स साडेसहा गुणासह आघाडी कायम राखण्यात यश मिळवले आहे तर द्वितीय मानांकित गतविजेती नागपूरची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख सहा गुणासह द्वितीय स्थानावर आहे.अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतीका अग्रवाल, आठवी मानांकित औरंगाबादची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर साक्षी चितलांगे, दहावी मानांकित कर्नाटकची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ईशा शर्मा या तिघीजण साडेपाच गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.तृतीय मानांकित पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथन, अर्जुन पुरस्कार विजेते पाचवी मानांकित गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी, सातवी मानांकित कोल्हापूरची महिला मास्टर ऋचा पुजारी,मुंबईची महिला मास्टर आशना मखीजा, 14 वी मानांकित पेट्रोलियमम स्पोर्ट्स बोर्डची आंतरराष्ट्रीय मास्टर निशा मोहता, तामिळनाडूची महिला ग्रँडमास्टर श्रीजा शेषाद्री,महिला ग्रँडमास्टर व्ही. वर्षीणी (तामिळनाडू), समृद्धा घोष (पश्चिम बंगाल), सी. संयुक्ता (तमिळनाडू), पोतलुरु सुप्रीता (आंध्र प्रदेश) व चंद्रेई हजरा (पश्चिम बंगाल) या अकराजणी पाच गुणासह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या या स्पर्धा दिल्लीच्या एम पी एल स्पोर्ट्स फाउंडेशनने प्रायोजित केले आहेत तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी सह प्रायोजक आहे.चितळे डेअरी,जैन इरिगेशन जळगाव,एच टू इ सिस्टीम पुणे व फिरोदीया ग्रुप,अहमदनगर हे सहयोगी प्रायोजक आहेत.स्विस् लिग पद्धतीने एकूण 11 फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेतील चार फेऱ्या अजून शिल्लक राहिल्या आहेत.उद्याची आठवी फेरी सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहे.
केन एंटरप्राइज प्रा.लि. इचलकरंजीचे उद्योगपती निकुंज बागडिया व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे यांच्या हस्ते सातव्या फेरीची सुरुवात करण्यात आली.पहिल्या पटावर चौथी मानांकित पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने पेट्रोलियम स्पोर्ट्सच्याच,तृतीय मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामीनाथनचा पराभव करत स्पर्धेतील आपली आघाडी कायम ठेवली. इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या लढतीत डावात समतोल स्थिती असताना सौम्याने प्याद्याची चुकीची चाल रचल्यामुळे मेरीने त्याचा अचूक फायदा घेत डावावर निर्णायक वर्चस्व राखले व अखेर ५१ व्या चालीला सौम्यास डाव सोडण्यास भाग पाडले.दुसऱ्या पटावर गतविजेती नागपूर ची महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आशना मखीजा हिला अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. रुई लोपेज प्रकाराने रंगलेल्या डावात दिव्याने मध्यपर्वात कल्पक चाली रचत आशनाची वजीराकडील बाजू कमकुवत केली व अंतिम पर्वात त्याचा फायदा घेत प्याद्याची बढत घेतली. दिव्याच्या प्याद्याचे वजीरात रूपांतर होत असल्याचे दिसताच आशनाने ५१व्या चालीला डाव सोडणे पसंत केले.तिसऱ्या पटावर महाराष्ट्राची महिला मास्टर साक्षी चितलांगे व अर्जुन पुरस्कार प्राप्त गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णी यांच्यातील लंडन सिस्टिमने झालेल्या प्रेक्षणीय लढतीत सुरुवातीलाच भक्तीने केलेल्या अनियमित चालींचा साक्षीने पुरेपूर फायदा घेत उंट व घोड्याच्या नेत्रदीपक संघटित चाली करत भक्ती च्या राजावर जोरदार आक्रमण केले व अवघ्या २४व्या चालीतच भक्ती ला पराभवाचा धक्का दिला.चौथ्या पटावर पश्चिम बंगालची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अर्पिता मुखर्जी व स्पर्धेतील अग्रमानांकित दिल्लीची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल यांच्यातील सिसिलियन मॉस्को व्हेरीएशनने झालेल्या चुरशीच्या लढतीत अर्पिताने वजीराच्या केलेल्या चुकीच्या खेळीचा वंतिकाने चतुराईने उपयोग करून घेत घोड्याच्या बदल्यात हत्ती मिळविला व ५१ व्या चालीला अर्पिताला डाव सोडण्यास भाग पाडले.पाचव्या पटावर तामिळनाडूची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर एम्.महालक्ष्मी व कर्नाटकची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा यांच्यातील निमझो इंडियन डिफेन्सने झालेल्या डावात मध्यपर्वात ईशाने वजीराच्या सुरेख चाली रचत महालक्ष्मीला अडचणीत आणले… ३८व्या चालीला उंटाचे बलिदान करून हत्ती मिळविला.त्यानंतर ईशाला विजय होताना फारसे प्रयास पडले नाहीत.सहाव्या पटावर आयुर्विमा महामंडळाची महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे व कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारी यांच्यातील रंगलेल्या लक्षवेधक लढतीत ऋचाने हत्तीचे सुंदर बलिदान देत घोडा व वजीराच्या सहाय्याने ४७ व्या चालीला स्वातीवर नेत्रदीपक विजय मिळवला. तसेच पश्चिम बंगालची चंद्रेयी हजरा, तामिळनाडूची सी संयुक्ता, पश्चिम बंगालची सम्रिधा घोष, राजन्या दत्ता या युवा खेळाडूंनी अनुक्रमे आंध्र प्रदेशची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मोनिका बोमिनी, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर मृदल डेहानकर, गुजरात ची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर तेजस्विनी सागर व हरियाणाची नामांकित खेळाडू ईशवी अग्रवाल यांना पराभवाचा धक्का देत स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदविला. तर जळगावची राष्ट्रीय ज्युनिअर विजेती भाग्यश्री पाटीलला कोल्हापूरच्या दिव्या पाटील हिने बरोबरीत रोखत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.