
no images were found
पाकिस्तानात हिंदू महिलेची शीर, हातपाय तोडून अमानुष हत्या
इस्लामाबाद : पाकिस्तानात एका हिंदू महिलेची अमानुष पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे. शिंजोरो शहरात बुधवारी ही घटना घडली. यामध्ये महिलेचे हातपाय तोडून शीर धडावेगळं करण्यात आलं तर तिचे स्तनही कापण्यात आल्यानं थरकाप उडवणारं कृत्य घडलं आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेत्या कृष्ण कुमारी यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. हत्या करण्यात आलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव दया भेल असून ती साधारण ४० वर्षांची आहे. या महिलेच्या पतीचं निधन झालं आहे. विधवा असलेल्या या महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. हे रानटी कृत्य करणाऱ्या लोकांनी तिच्या डोक्यावरचं संपूर्ण त्वचाही काढली आहे. तिचा मृतदेह आणि कापलेलं डोके गव्हाच्या शेतात टाकण्यापूर्वी आरोपीनं तिच्या डोक्याची कातडी काढण्यापर्यंत मजल गेल्यानं हा अमानुषतेचा कळस झाला आहे. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती देणाऱ्या कृष्ण कुमारी या पाकिस्तानातील पहिल्या महिला सिनेटर असून त्या हिंदू आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी या पक्षाच्या त्या सदस्य आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात सिंध प्रांतातील १८ वर्षीय हिंदू तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. या तरुणीचं नाव पूजा होतं तिला ज्या व्यक्तीनं मारलं होतं त्या वाहिद बक्स लशरी यानं तिला लग्नापूर्वी धर्मांतर करण्यासाठी तगादा लावला होता.