no images were found
कचनेरच्या १ कोटीच्या सुवर्ण मूर्तीचे केले तुकडे : २४ तासांत चोरटे गजाआड
९४ लाख ८७ हजारांच्या सोन्याच्या नाण्यांसह ऐवज जप्त
कचनेर : पोलिसांनी येथील मंदीरातील १ कोटी ५ लाख रुपये किमतीची सोन्याची पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती चोरून त्याठिकाणी पितळेची मूर्ती ठेऊन पसार झालेल्या चोरट्यांना २४ तासांत पकडण्यात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला यश आले आहे.
स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेने अर्पित नरेंद्र जैन (३२, रा. शिवपुरी जि. गुणा, मध्यप्रदेश), अनिल भवानिदीन विश्वकर्मा (२७, रा. शहागड, जि. सागर, मध्यप्रदेश) या दोघांना अटक केली. त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून १ किलो ७०० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मूर्तीचे तुकडे आणि ७० हजार रुपये रोख जप्त केले.
रविवार २५ डिसेंबर रोजी चिकलठाणा पोलिसठाण्यात व्यापारी विनोद लोहाडे यांनी तक्रार दिली होती. या घटनेसंदर्भातील गांभीर्य पाहून ताबडतोब पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनेच्या तपासाची चक्रे फिरविली. या प्रकरणी पोलिस आधिक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध माहितीच्या आधारे स्थानिक व गुन्हे शाखेच्या स्वतंत्र पथकाकडून युद्धपातळीवर तपासाच्या हालचाली सुरू केल्या आणि या प्रयत्नास फक्त २४ तासांत आरोपीला पकडण्यात पोलिसांनी यश मिळविले.
चातृमासादरम्यान जैन समाजाच्या सौभाग्यसागर महाराजांच्या सेवकांसोबत मुख्य आरोपी अर्पित नरेंद्र हा जैन सेवक म्हणून उपस्थित होता. चातुर्मास संपल्यानंतर आरोपी नरेंद्र जैन मध्य प्रदेशला गेला. त्यानंतर २० दिवसांनी तो कचनेरला परत आला.
मंदिरात असणारी सोन्याची मूर्ती दररोज अभिषेकासाठी गाभाऱ्या बाहेर काढली जात असे आणि अभिषेक पूर्ण होताच पुन्हा पूर्ववत ठेवली जात होती याबद्दलची संपूर्ण माहिती आरोपी आर्पितला होती. त्यामाहितीच्या आधारे त्याच दरम्यान संधी साधून त्याने १४ डिसेंबर रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली सोन्याची मूर्ती आभिषेक करण्याच्या बहाण्याने हातचालखी करत चोरली व त्या जागी राजस्थानमधील जयपूर येथून तयार करून आणलेली नकली पितळी मूर्ती त्या जागी ठेवून तो निघून गेला.
मंदिरातून सोन्याची मूर्ती चोरून आरोपी अर्पित जैन मध्य प्रदेशातील त्याच्या मूळगावी गेला. तेथे त्याने त्याचा मित्र अनिल विश्वकर्माच्या मदतीने मूर्तीचे कटर मशिनच्या मदतीने तुकडे केले. त्यापैकी ३५० ग्रॅम सोने भोपाळ शहरातील एका सोनाराला विकले. आलेल्या पैशातून त्याने सोन्याचे दोन नाण्यांची खरेदी केली व उर्वरीत पैशातून त्याच्यावर असणारे कर्ज फेडल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.