
no images were found
कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर आजपासून फुटबॉल हंगाम
कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे फुटबॉल हंगाम लांबणीवर पडत चालला होता. आता जवळजवळ २ वर्षांच्या कालावधीनंतर कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर फुटबॉल हंगाम रंगत आहे.
मंगळवारी (आज) दुपारी फुलेवाडी विरुद्ध संध्यामठ सामन्याने सुरुवात होईल. आजपासून सुरु होत असलेल्या हंगामासाठी 16 संघ रिंगणात असून 348 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील 348 खेळाडू असून देशभरातील 22 खेळाडूंचा सहभाग आहे. 24 परदेशी खेळाडू आहेत. साखळी पद्धतीने 56 सामने पार पडतील.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त के. एस. ए. लीगचे शाहू छत्रपती के. एस. ए. लीग असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच गोल्ड कप स्पर्धा शाहू गोल्डकप नावाने ओखळली जाईल. लीग सामन्याचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन इन्-चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते दुपारी ४. वाजता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे मनपा प्रशासक कादंबरी बलकवडे, शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची उपस्थिती लाभेल. हे सामने विनाअडथळा शांततेत पार पाडणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे. आजपासून दि. ३० डिसेंबर पर्यंतच्या चार दिवसांत ८ सामने पार पडतील.
आजपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, बीजीएम स्पोर्टस्, बालगोपाल तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, संयुक्त जुना बुधवार पेठ, खंडोबा तालीम मंडळ-अ, कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, झुंजार क्लब, सम्राट नगर स्पोर्टस्, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, रंकाळा तालीम मंडळ या संघांचा सहभाग आहे.