no images were found
शैक्षणिक धोरणातील नवीन तरतुदी- दीपक केसरकर
मुंबई : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. त्यानुसार अभ्यासक्रम तसेच अभ्यासक्रमातील रचनांमध्ये बदल केले जातील. याच पार्श्वभूमीवर पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे न लादता, त्यांच्या मेंदूचा विकास होण्याकरिता त्यांचा गृहपाठ बंद केला जाणार आहे. त्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. याबद्दलची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून १६ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आली होती.
दरम्यान याबाबत शिक्षण विभागाकडे अनेक संस्थांनी या अभ्यासक्रमासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या शिफारशी विचारात घेऊन त्याचबरोबर राज्यातील विविध शिक्षक संघटना, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत बैठका घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गृहपाठ बंद झाल्यास शिक्षक तसेच शाळा यांनी चुकीचा अर्थ काढतील किंवा त्यातून पळवाटा काढतील, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. नवीन आणि सध्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना पटकन आणि योग्य समजेल, अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवण्याची आवश्यकता असून नविन शैक्षणिक धोरणानुसार शिकविल्यास विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज भासणार नसल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.