no images were found
एकाच मांडवात जुळ्या मुलींशी केलेल्या लग्नाचा मुद्दा नवनीत राणा यांनी संसदेत मांडला
नवी दिल्ली : सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन महिलांशी केलेल्या बहुचर्चित विवाहाचा मुद्दा आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. हा विवाह भारतीय संस्कृतीसाठी धक्कादायक असून असे विवाह रोखणारा कोणताही नियम किंवा कायदा अस्तित्वात नाही. अशा विवाहासाठी नियम, कायदे तयार केले जावेत, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी काल लोकसभेमध्ये केली आहे.
अकलूज तालुक्यात अतुल अवताडे या तरुणाने जुळ्या बहिणींशी एकाच मंडपात विवाह केल्यानंतर ही घटना सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर राज्य महिला आयोगानेही नोटीस बजावली होती. तर चौकशीसाठी अकलूज पोलिसांनी दाखल केलेली याचिका सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर या त्रिकूटांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करून या प्रकारांची पुनरावृत्ती रोखणारे नियम, कायदे तयार करावेत अशी मागणी केली आहे. खासदार नवनीत राणा म्हणाल्या, की महाराष्ट्रातल्या सोलापूरमधील घटना हिंदू संस्कृतीवर डाग लावणारी आहे. एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन महिलांशी विवाह केला आहे. भारतीय दंड संहितेची ४९४ तसेच ४९५ कलमे आहेत. परंतु एका मंडपात दोन महिलांशी विवाह करण्याला रोखणारा असा कोणताही नियम किंवा कायदा नाही. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायदा तयार केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.