
no images were found
गोवर रुबेला लसीकरणास गुरुवारपासून सुरुवात
कोल्हापूर : राज्यातील शहरामध्ये सद्या गोवरचा प्रादुर्भाव वाढत असलेने त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचे मार्गदर्शनाखाली शहरात घरोघरी सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत पहिल्या टप्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा गुरुवार दि.15 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येत आहे. तर दुसरा टप्पा दि.15 ते 25 जानेवारी 2023 राबविण्यात येणार आहे.
गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयाची जळजळ, चेह-यावरील आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येतात. गोवर हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. या आजाराची लक्षणे आढळलेस घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयाला भेट दयावी. प्रशासक यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहून अधिक गतीमानाने कृतीशील कार्यवाही करणेचे निर्देशित केले आहे. याअनुषंगाने मोहिम कालावधीमध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांना लसीकरण करणेत येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गोवर रुबेलाचे कामकाज सुरु असून नोव्हेंबर अखेर 6932 एवढया मुलांना पहिला डोस व 6868 मुलांना दुसरा डोस देणेत आला आहे. तसेच गोवर रुबेला लसीकरणाबरोबरच व्हिटॅमिन ए जीवनसत्वाचा डोस देणेत येणार आहे. यामध्ये 9 महिने ते 12 महिने वयोगटातील मुलांना पहिला डोस आणि 16 ते 24 महिने वयोगटातील मुलांना दुसरा डोस देणेत येणार आहे. गोवर रुबेला लसीकरण 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करणेचे उद्स्टि आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 9 महिने ते 5 वर्षे ज्या मुलांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही अशा वंचित मुलांसाठी दोन टप्प्यामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.
शहरातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना गोवर रुबेला उद्रेकापासून बचाव करणेसाठी ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोवर रुबेलाचा पहिला व दुसरा डोस व व्हिटॅमिन-ए चा डोस दिला नसेल अशा पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 15 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत नजिकच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.