no images were found
बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयची झुंज अपयशी
चार दिवस चाललेल्या बचावकार्यानंतर तन्मयचा मृतदेह सापडला.
मध्य प्रदेश बेतुलमध्ये जवळ जवळ चार दिवसापूर्वी 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयची झुंज अखेर अपयशी ठरली असून चार दिवसांहून अधिक वेळ चाललेल्या बचावकार्यानंतर तन्मयचा मृतदेह सापडला आहे. मध्य प्रदेशातील ८ वर्षांचा तन्मय साहू हा ६ डिसेंबर रोजी 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला होता. एनडीआरएफच्या पथकाकडून बोअरवेलमध्ये अडकलेल्या तन्मयला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र या प्रयत्नांना अपयश आले असून तन्मयचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आला आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शवविच्छेदन अहवालात गुदमरणे आणि बरगड्यांना झालेली दुखापत हे मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर ट्वीट करीत शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, ‘या दुःखाच्या वेळी आम्ही तन्मयच्या कुटुंबीयांच्यासोबत आहोत, त्यांनी स्वतःला एकटं समजू नये. मी आणि संपूर्ण मध्य प्रदेश तन्मयच्या कुटुंबासोबत आहोत. राज्य सरकारकडून पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ईश्वरचरणी तन्मयच्या आत्म्यास शांती लाभो. श्रद्धांजली!’