Home Uncategorized विकासकामांना विलंब खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांनी कामांचा तातडीने निपटारा करावा – आमदार राजेश क्षीरसागर

विकासकामांना विलंब खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांनी कामांचा तातडीने निपटारा करावा – आमदार राजेश क्षीरसागर

2 second read
0
0
11

no images were found

विकासकामांना विलंब खपवून घेणार नाही; अधिकाऱ्यांनी कामांचा तातडीने निपटारा करावा – आमदार राजेश क्षीरसागर

महानगरपालिका प्रशासनाच्या आढावा बैठकीत विविध विकासकामांचा घेतला आढावा; प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कोल्हापूर : शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड, मनपा गाळेधारकांचे प्रश्न, अनधिकृत बांधकाम, विविध स्मारके, पार्किंग व्यवस्था, क्रीडा सुविधा, उद्याने, जलतरण तलाव, तसेच शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांना होणारा विलंब आणि अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी कारणे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला.

*झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा
झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या प्रक्रियेबाबत महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे आमदार क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे झोपडपट्टीधारकांना त्यांच्या मालमत्तेवरील हक्क अधिकृतपणे प्राप्त होऊन त्यांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, शहरात कोणी दादागिरी करत असेल, तर त्याला उत्तर देण्यास आपण सक्षम असल्याचे सांगत अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

*गाळेधारकांच्या प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढा*
महानगरपालिकेच्या गाळेधारकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करताना भाडे कमी करण्याचा अधिकार प्रशासनाला नसला, तरी गाळेधारक आणि महानगरपालिका प्रशासन या दोन्ही बाजूंनी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

*सिद्धांत हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर २० दिवसांत कारवाई करा*
सिद्धांत हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासनाने आजपर्यंत काय कारवाई केली, अशी विचारणा आमदार क्षीरसागर यांनी केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित होऊ शकणारे बांधकाम नियमित करण्याबाबत सूचना असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यावर अतिरिक्त बांधकाम करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर येत्या २० दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

*स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी पाच कोटींचा निधी*
निवृत्ती चौक येथील जनता बाजार परिसरातील सध्या बंद असलेल्या हॉस्पिटलच्या जागेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देत असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले. यासंदर्भात प्रायमा कंपनीसोबत चर्चा सुरू असून आज किंवा उद्या करार प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
शाहू क्लॉथ मार्केट आणि कोंबडी बाजार या दोन्ही जागांचा एकत्रित विकास करून महानगरपालिकेची इमारत आणि पार्किंग सुविधा उभारता येईल का, याबाबत आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सुचविले. हलसवडे येथील प्रस्तावित सोलर पार्कच्या जागेत सोलर पार्कसोबतच डॉग शेल्टर उभारण्याची शक्यता तपासण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम दर्जेदार करा
कसबा बावडा येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा घेताना पुतळा समितीसोबत बैठक घेऊन त्यांच्या समन्वयातून कोल्हापूरच्या वैभवाला साजेसे स्मारक उभारावे, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी केल्या.
 २०२२ पासून मंजूर निधीतील कामांचे सर्वेक्षण करा
सन २०२२ पासून विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असतानाही अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निधी मंजूर झाला, बिल निघाले; मात्र प्रत्यक्षात काम झालेले नाही, कंत्राटदार काम करत नाहीत, अशी उत्तरे आता चालणार नाहीत. इस्टिमेट तयार करताना होणाऱ्या चुका आणि कामांच्या अंमलबजावणीतील त्रुटींना कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. चारही वॉर्ड कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील सुरू असलेल्या आणि प्रलंबित कामांची तातडीने माहिती घेऊन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
सासणे मैदानासाठी आजपर्यंत किती निधी दिला, तरीही काम का पूर्ण झाले नाही? रामेश्वर मंदिरासमोरील फुटबॉल स्टेडियमसाठी ५० लाख रुपये दिले असताना कामाची सद्यस्थिती काय आहे? असे सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. हुतात्मा पार्कसाठी दिलेल्या ४५ लाखांच्या निधीचे काय झाले, अंबाबाई मंदिरातील विद्युत दिव्यांच्या कामाची अंमलबजावणी कुठपर्यंत आली, तसेच त्यासाठी वापरण्यात आलेल्या वायर चुकीच्या पद्धतीने का टाकण्यात आल्या, अशी विचारणा करत संबंधित अधिकारी कामे ऐकत नसतील तर त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पार्किंग ठेकेदारांच्या समस्या सोडवा; सुविधा दिल्यानंतरच पैसे घ्या
सरस्वती टॉकीज परिसरातील बहुमजली पार्किंगच्या ठेकेदारांनी बैठकीत आपल्या अडचणी मांडल्या. यावर पार्किंगसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा ३० तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रशासनाने सांगितले. त्यावर नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच पार्किंगचे पैसे आकारावेत, असे आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. तसेच गांधी मैदान परिसरातील पार्किंग तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या.

*गांधी मैदानात जलतरण तलावासाठी प्रस्ताव सादर करा*
गांधी मैदान परिसरात जलतरण तलाव उभारण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच अंबाई टँक आणि टाकाळा येथील जलतरण तलावांची कामे एनकॅप निधीतून तातडीने पूर्ण करून हे तलाव नागरिकांच्या वापरासाठी खुले करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

*विकासकामांत लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या
डीपीडीसी बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचा संदर्भ देत, संबंधित विभागाच्या आमदारांना विश्वासात न घेता कामे कशी केली जातात, अशी विचारणा त्यांनी केली. शामसुंदर सोसायटी येथील नेचर पार्कच्या कामाबाबतही अधिकाऱ्यांना जाब विचारला.
केएमटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या प्रश्नावर आगामी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व भागांमध्ये भूमिगत केबल आणि गॅस पाइपलाइनचे जाळे सक्षमपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याचीही माहिती त्यांनी घेतली.

 बेलबाग येथील धोकादायक खड्डा तातडीने मुजवा
बेलबाग येथील दिव्यांग भवनाची जागा स्थलांतरित करून सध्याच्या जागेवर निर्माण झालेला धोकादायक खड्डा तातडीने मुजवावा. त्या जागेवर नागरिकांच्या मागणीनुसार विरंगुळा केंद्र किंवा उद्यान विकसित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीचे इतिवृत्त तयार करून निर्णयांचा पाठपुरावा करा
बैठकीत प्रत्येक विषयावर चर्चा होऊनही प्रत्यक्ष कामात प्रगती होत नसल्याबद्दल आमदार क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली. मागील बैठक आणि आजच्या बैठकीत काहीच फरक दिसत नाही, असे सांगत प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त (मिनिट्स) तयार करावे. बैठकीत ज्या कामांबाबत चर्चा झाली आणि जे निर्णय घेण्यात आले, त्यांचा संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाठपुरावा करून कामे पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपायुक्त धनवडे, परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक संचालक प्रशांत भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आश्पाक आजरेकर, नेपोलियन सोनुले आदी उपस्थित होते.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…