no images were found
रामायणातील व्यक्तिरेखांची मोडतोड करणार्या चित्रपटाविरोधात कोल्हापुरात तीव्र आंदोलन; आक्षेपार्ह दृश्ये हटवून पुनर्तपासणी करण्याची मागणी !
कोल्हापूर – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटात मूळ रामायणातील प्रसंगांचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, तर प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या आदर्श व्यक्तिरेखांचे अवमूल्यन करण्यात आले आहे. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामायणाची अशा प्रकारे मोडतोड करून त्यातून विशिष्ट वैचारिक अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद तातडीने हटवावेत, तसेच आगामी भाग प्रदर्शित करण्यापूर्वी त्याचे संत, रामायणाचे अभ्यासक आणि धर्मशास्रांंच्या जाणकारांसमोर परीक्षण करावे, या मागण्यांसाठी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २० नोव्हेंबरला हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक आणि रामभक्त सहभागी झाले होते. हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, शिवराष्ट्र-धर्म संघटनेचे संस्थापक श्री. दिलीप भिवटे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदु महासभेचे श्री. राजेंद्र तोरस्कर, श्री. मनोहर सोरप, भाजपचे श्री. विजय देवणे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री निरंजन शिंदे, योगेश केरकर, विकास जाधव, राजू यादव, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, यांसह अन्य उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
*चित्रपटातील काही प्रमुख आक्षेपार्ह प्रसंग*
अस्रशस्रांनी सज्ज असलेले प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांना पाहून पळ काढत असल्याचे, तर दुसरीकडे निःशस्र रावण हजारो सैनिकांशी एकटाच लढून त्यांचा वध करत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे, रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि महिलांचे रक्षण करणारा दाखवून त्याच्या अत्याचारांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, बंधुप्रेम, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणाला उद्धट, उपरोधिक आणि विनोदी व्यक्तिरेखेत दाखवण्यात आले आहे.
*आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या !*
चित्रपटातील प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या व्यक्तिरेखांचे अवमूल्यन करणारी, रावणाचे उदात्तीकरण करणारी आणि मूळ रामायणाशी विसंगत असलेली आक्षेपार्ह दृश्ये व संवाद तातडीने हटवावेत. केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाने या चित्रपटाची पुनर्तपासणी करून आक्षेपार्ह दृश्ये वगळलेल्या सुधारित आवृत्तीचे पुनर्प्रमाणन करावे. त्यानंतरच पुढील सार्वजनिक प्रदर्शनास अनुमती द्यावी. आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या दुसर्या भागाची संपूर्ण पटकथा आणि अंतिम चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी संत, वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक, संस्कृत व धर्मशास्रांचे जाणकार यांच्या समितीकडून तपासून घ्यावा.