Home प्रकाशन कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे

4 second read
0
0
9

no images were found

कर्तृत्वाने कार्यक्षेत्र समृद्ध करणारे डॉ. भोसले खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’! – डॉ. यशवंत पाटणे -डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या ‘मी एक भाग्यवान’ पुस्तकाचे प्रकाशन

   कोल्हापूर(प्रतिनिधी):- डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी आपले कार्यक्षेत्र कर्तृत्वाने समृद्ध केले आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘भाग्यवान’ आहेत. जीवनात शिक्षक आणि मदत करणारी माणसेच खरे शिल्पकार असतात. प्रगतीच्या पथावर मदत करणाऱ्या या माणसांना मनात कायम स्थान द्यायला हवे. याच कृतज्ञतेच्या भावनेतून साकारलेले डॉ. भोसले यांचे ‘मी एक भाग्यवान’ हे पुस्तक एक उत्तम ‘व्यक्ती चरित्रात्मक आत्मचरित्र’ आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते व माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले लिखित ‘मी एक भाग्यवान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते कसबा बावडा येथील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पाटणे बोलत होते. व्यासपीठावर डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे माजी कुलपती डॉ. बी. पी. साबळे, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भगवान हिर्डेकर, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके, सौ. कुसुम व्ही. भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. पाटणे यांनी जीवनातील संघर्षाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, केवळ गुणांच्या टक्क्यांवरून माणूस मोठा होत नाही, तर जीवनात टक्के-टोणपे खाऊन जी अनुभव संपन्नता येते, तीच खरी गुणवत्ता असते. ज्या संस्थेत गुणवत्तेची अचूक नोंद घेणारे डॉ. संजय डी. पाटील यांच्यासारखे संस्थाचालक असतात, तिथेच असे माणिक-मोती घडतात. नियतीच्या कृपेने माणूस नशीबवान ठरतो, मात्र कष्टाने आलेल्या अडथळ्यांवर मात केल्यावरच खऱ्या अर्थाने भाग्य उजळते. परतत्त्वाचा स्पर्श झाला की माणसाचा उत्कर्ष होतो, त्याप्रमाणे डॉ. भोसले यांच्यातील चांगला लेखक घडला आहे. हे पुस्तक वाचून प्रत्येकाचे हात भाग्यवान व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. भगवान हिर्डेकर यांनी डॉ. भोसलेंच्या कार्याचा गौरव केला. सलग दोन दशके कुलसचिव पदावर कार्यरत असलेले डॉ. भोसले हे बहुधा एकमेव व्यक्ती असावेत. आपले आयुष्य घडवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाबाबत लिहिलेच पाहिजे, कारण या पुस्तकातून अनेकांसाठी शिकण्यासारखे खूप काही आहे, असे ते म्हणाले.

डॉ. अमर आडके यांनी मार्टिन ल्युथर किंग यांच्या विचारांचा दाखला देत सांगितले की, माणूस कुठून आला यापेक्षा तो कुठे पोहोचला, हे अधिक महत्त्वाचे असते. समाजात प्रसिद्धीपासून दूर असलेली आणि निष्ठेने काम करणाऱ्या माणसाचा नेहमी सन्मान व्हायला हवा आणि डॉ. भोसले यांच्या पुस्तकातून अशा व्यक्तींचा सन्मान झाला आहे.

आयुष्यात देवदूत भेटले अन् प्रगती झाली : डॉ. भोसले :
लेखक डॉ. व्ही. व्ही. भोसले म्हणाले, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे. एका गावातून असंख्य अडचणी पार करत घेतलेली पदवी आणि शिवाजी विद्यापीठातील सांख्यिकी सहाय्यक ते डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठातील सलग २१ वर्षे कुलसचिव हा माझा प्रवास डॉ. साबळे सर आणि आयुष्यात भेटलेल्या देवदूतांसारख्या माणसांमुळेच शक्य झाला. त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून डॉ. पाटणे यांच्या सूचनेनुसार आणि डॉ. हिर्डेकर यांच्या मदतीने मी हे पुस्तक शब्दबद्ध केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कामाक्षी भोसले-शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिल खटावकर यांनी मानले. यावेळी डॉ. भोसले यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्याला डॉ. भालबा विभुते, डॉ. व्ही. एस. मुढे यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, कृष्णा महाविद्यालय रेठरे येथील माजी विद्यार्थी, डॉ. भोसले यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In प्रकाशन
Comments are closed.

Check Also

मान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!

मान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर ज…