no images were found
महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात कार्यक्रम होईल. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, जनसंपर्क कक्ष आणि कला व साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला आहे.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते आणि वारणानगर येथील वारणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम होईल. कुलगुरू प्रा. राजनिश कामत अध्यक्षस्थानी असतील.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठाने आपल्या ‘शिववाणी’ युट्यूब वाहिनीवरुन ‘गाथा स्वातंत्र्यसैनिकांची’ ही दैनंदिन मालिका वर्षभर सलग चालविली. या मालिकेतील स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकार्याचे शब्दांकन करून त्याचे ग्रंथरुपात संपादन करण्यात आले आहे. डॉ. अविनाश पाटील आणि डॉ. दत्तात्रय मचाले यांनी संपादन केले आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. ज्योती जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. अरुण भोसले, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अविनाश पाटील तसेच कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. इतिहास, स्वातंत्र्य चळवळ विषयांत रस असलेल्या नागरिकांनी, विद्यार्थी, संशोधक आणि विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.