no images were found
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चा कायापालट होणार; प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढणार
एप्रिल २०२७ मध्ये पाडकामाला सुरुवात; डिसेंबर २०३० पर्यंत नवे टर्मिनल उभारण्याचे नियोजन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) टर्मिनल १ चा पुनर्विकास करण्यात येणार असून, नव्या टर्मिनलची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता १.५ कोटींवरून दोन कोटींपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एप्रिल २०२७ मध्ये सध्याच्या टर्मिनलचे पाडकाम सुरू होणार असून, डिसेंबर २०३० पर्यंत नवीन टर्मिनल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पुनर्विकासामुळे मुंबई विमानतळाची एकूण वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सहा कोटी ५० लाखांपर्यंत पोहोचणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने टर्मिनल १ च्या प्रस्तावित पुनर्विकासाची संकल्पनात्मक चित्रे एअरपोर्ट एअरलाइन ऑपरेटर्स कमिटीच्या (एओसी) बैठकीत सादर केली. नव्या टर्मिनलमध्ये आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, प्रवाशांसाठी सुलभ व्यवस्था आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या वास्तुरचनेवर भर देण्यात येणार आहे. सादर केलेली चित्रे प्रस्तावित रचनेची संकल्पना दर्शवितात; अंतिम बांधकामात बदल होऊ शकतात.
जुन्या टर्मिनलच्या जागी आधुनिक सुविधा
१९६४ मध्ये सुरू झालेले टर्मिनल १ आता जुने झाले आहे. स्ट्रकवेलने २०१७ मध्ये आणि आयआयटी मुंबईने २०२४ मध्ये केलेल्या स्वतंत्र परीक्षणांमध्ये इमारतीच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आणि संरचनात्मक कमकुवतपणा अधोरेखित करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि वाढत्या विमान वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या टर्मिनलच्या जागी नवीन सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नव्या टर्मिनलमध्ये प्रवाशांना विमानतळावर सहजपणे वावरता यावा आणि चेक-इनपासून बोर्डिंगपर्यंतच्या प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करता याव्यात, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
चेक-इन काउंटर १०९, सुरक्षा तपासणीसाठी २० मार्ग
पुनर्विकासानंतर टर्मिनलमधील विविध सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
- प्रवासी क्षमता : वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता १.५ कोटींवरून दोन कोटींपर्यंत वाढणार आहे. ही वाढ सुमारे ३३ टक्के असेल.
- चेक-इन काउंटर : सध्याचे ७४ काउंटर वाढवून १०९ करण्यात येणार आहेत.
- सुरक्षा तपासणी : प्रवाशांसाठी १५ आणि ट्रान्सफर प्रवाशांसाठी पाच असे एकूण २० सुरक्षा तपासणी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- विमानापर्यंत थेट जोडणी : विमानतळाच्या टर्मिनलला थेट जोडलेल्या विमान पार्किंग स्थानांची संख्या सातवरून २५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
- बोर्डिंग सुविधा : प्रवाशांच्या बोर्डिंगसाठी १२ अत्याधुनिक ई-गेट्स उभारण्यात येणार आहेत.
- सामान वितरण : सामान मिळण्यासाठी असलेल्या बेल्टची संख्या पाचवरून ११ पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
या सुविधांमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास आणि विमानतळावरील विविध प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचे दर्शन : नव्या टर्मिनलची वास्तुरचना केवळ आधुनिक सुविधांपुरती मर्यादित न ठेवता, मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब त्यात उमटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रवेशद्वार भव्य आणि प्रशस्त असेल. चेक-इन हॉलमध्ये नैसर्गिक प्रकाशाने उजळलेली, खांबविरहित मोकळी जागा आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी भित्तिचित्रे असतील.
प्रस्थान प्रतीक्षा क्षेत्रात हिरवळीने नटलेले वातावरण, प्रीमियम लाउंज आणि धावपट्ट्यांचे दृश्य दिसणाऱ्या मोठ्या काचेच्या भिंती असतील. आगमनाच्या भागात मुंबईच्या जैवविविधतेचे प्रतीक असलेले फ्लेमिंगो पक्ष्याचे भव्य शिल्प उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.
विमानसेवा सुरू ठेवून पुनर्विकास
टर्मिनल १ च्या पुनर्विकासादरम्यान मुंबई विमानतळावरील विमानसेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे.
एप्रिल २०२७ मध्ये जुन्या टर्मिनलच्या पाडकामाला सुरुवात होईल. या काळात देशांतर्गत प्रवाशांची अतिरिक्त वाहतूक हाताळण्यासाठी टर्मिनल २ च्या उत्तर-पश्चिम भागात जी+३ स्वरूपाचा विस्तार करण्यात येणार आहे. हा विस्तारित भाग मार्च २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
त्यानंतर टर्मिनल १ च्या जागी नवीन टर्मिनल उभारण्यात येईल. डिसेंबर २०३० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
नव्या टर्मिनलच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विमानतळाची वाढती प्रवासी वाहतूक हाताळण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे.