no images were found
अंबुजा सिमेंट्सच्या व्यापार आणि प्रीमियम उत्पादनांच्या विक्रीत वाढ; प्रतिकूल परिस्थितीतही गुणवत्ता आधारित विकासावर भर
अहमदाबाद,: अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. हंगामी आणि बाह्य प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम असतानाही कंपनीने व्यापार क्षेत्रातील विक्री आणि प्रीमियम उत्पादनांच्या विक्रीतील वाटा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. दुसऱ्या तिमाहीत कंपनीची सिमेंट विक्री १६.५ दशलक्ष टन नोंदविण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत व्यापार क्षेत्रातील विक्रीत ८.६ टक्के वाढ झाली असून, एकूण विक्रीतील व्यापार क्षेत्राचा वाटा ६ टक्के गुणांनी वाढून ७४ टक्क्यांवर पोहोचला. तसेच, व्यापार विक्रीतील प्रीमियम उत्पादनांचा वाटा २ टक्के गुणांनी वाढून ३७ टक्के झाला.
दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल ९,१९७ कोटी रुपये, तर ऑपरेटिंग ईबीआयटीडीए १,२७१ कोटी रुपये नोंदविण्यात आला. ईबीआयटीडीए मार्जिन १३.८ टक्के आणि प्रति टन ईबीआयटीडीए ७७० रुपये राहिला. इंधन आणि लॉजिस्टिक्सच्या वाढत्या खर्चामुळे उद्योगाच्या नफ्यावर दबाव असतानाही कंपनीने उत्पादनांच्या विक्रीतील योग्य मिश्रण, खर्च नियंत्रण आणि कामकाजातील कार्यक्षमतेवर भर दिला. पेटकोक व कोळशाच्या वाढलेल्या किमती, कोळशाची मर्यादित उपलब्धता तसेच डिझेल आणि पॅकेजिंग खर्चातील वाढ यांचा परिणाम खर्चावर झाला. तिमाहीत एकूण खर्च प्रति टन ४,४१० रुपये होता; भू-राजकीय संघर्षांमुळे झालेला परिणाम वगळल्यास हा खर्च प्रति टन ४,१८२ रुपये राहिला.
अंबुजा सिमेंट्सचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बाहेती यांनी सांगितले की, हंगामी आणि बाह्य आव्हाने असूनही कंपनीने गुणवत्ता आधारित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापार आणि प्रीमियम उत्पादनांच्या विक्रीतील वाढीमुळे महसुलाची गुणवत्ता सुधारली असून, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि खर्च व्यवस्थापनामुळे नफाक्षमता टिकवण्यास मदत झाली. उत्पादनातील उत्कृष्टता, ऊर्जा कार्यक्षमता, लॉजिस्टिक्सचे अनुकूलन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे कंपनी व्यवसायाची कार्यक्षमता वाढवत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत ४.६ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचे उत्पादन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. यामध्ये दहेज येथे १.२ दशलक्ष टन, सलई बनवा येथे २.४ दशलक्ष टन आणि कलंबोली येथे १ दशलक्ष टन क्षमतेचा समावेश आहे. याशिवाय, दुसऱ्या सहामाहीत आणखी ५.६ दशलक्ष टन क्षमतेच्या प्रकल्पांवर काम सुरू असून, त्यातून उत्पादन वाढीस मदत होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीने आर्थिक शिस्त राखत आपली कर्जमुक्त ताळेबंद स्थिती कायम ठेवली आहे. कंपनीची निव्वळ संपत्ती ७२,२३८ कोटी रुपये असून, रोख रक्कम आणि रोख समतुल्य निधी १,०७० कोटी रुपये आहे. क्रिसिल, केअर, इंडिया रेटिंग्ज आणि आयसीआरए या संस्थांकडून कंपनीला सर्वोच्च AAA/A1+ पतमानांकन मिळाले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत प्रति टन खर्च ४,२५० रुपयांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुसऱ्या सहामाहीत व्यापार क्षेत्रातील विक्रीला गती देणे, संस्थात्मक व्यवसायातील विक्रीचे नियोजन आणि नवीन उत्पादन क्षमतेचा वापर यांमुळे विक्री वाढीस मदत होण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च, शहरीकरण, ग्रामीण गृहनिर्माण आणि औद्योगिक क्षेत्रातील हालचालींमुळे सिमेंटच्या मागणीला दीर्घकालीन आधार मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले.
कंपनीच्या ‘वन सिमेंट प्लॅटफॉर्म’ उपक्रमाला पुढे नेत अंबुजा सिमेंट्सच्या भागधारकांनी एसीसी लिमिटेड आणि ओरिएंट सिमेंट लिमिटेड यांचे अंबुजा सिमेंट्समध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणामुळे कंपनीची कॉर्पोरेट रचना अधिक सुलभ होण्यास, कार्यात्मक समन्वय वाढण्यास आणि दीर्घकालीन भागधारक मूल्य निर्माण करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित विलीनीकरणातून प्रति समभाग कमाईत वाढ होण्याची शक्यता असून, आवश्यक नियामक, वैधानिक आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पर्यावरणीय शाश्वतता आणि तंत्रज्ञानाच्या वापरालाही कंपनीने प्राधान्य दिले आहे. कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या सिमेंट उत्पादनाच्या दिशेने कंपनीने लेलॅक लिमिटेड सोबत भागीदारी केली असून, सांघीपुरम येथील ६.६ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेच्या प्रकल्पात कार्बन कॅप्चर आणि हायब्रिड विद्युतीकरण तंत्रज्ञानाच्या वापराची व्यवहार्यता तपासली जात आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत अदाणी सिमेंटने ७५.२ लाख झाडांची लागवड केली असून, ८३ लाख झाडांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू आहे. कंपनीने आयओटी सेन्सर्स आणि डिजिटल उत्पादन व लॉजिस्टिक्स प्रणालींचा वापर वाढवून कामकाजातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुधारली आहे. अंबुजा कवच आणि एसीसी गोल्ड वॉटर शील्ड या सिमेंट ब्रँडच्या पावसाळी मो₹हिमाही २,००० हून अधिक चित्रपटगृहांच्या पडद्यांवर तसेच डिजिटल आणि बाह्य माध्यमांद्वारे राबविण्यात आल्या असून, डिजिटल माध्यमातून ३ कोटींहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात आले.