no images were found
कोल्हापूर महापालिकेला राज्य शासनाकडून १२ फायर बुलेट : महापौर सौ.रूपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर,: आपत्कालीन परिस्थितीत आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला राज्य शासनाकडून १२ फायर बुलेट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या फायर बुलेटचा लोकार्पण सोहळा आज महापौर सौ. रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे करण्यात आला.
राज्य शासनाच्या महसूल, वन तसेच मदत व पुनर्वसन विभागामार्फत महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकांना त्यांच्या अग्निशमन केंद्रांच्या संख्येनुसार फायर बुलेट वितरित करण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला एकूण १२ फायर बुलेट प्राप्त झाल्या आहेत. शहरातील अरुंद गल्ल्या, बोळ, गर्दीची ठिकाणे तसेच महापालिकेची मोठी अग्निशमन वाहने पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी या फायर बुलेटचा उपयोग होणार आहे. प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविणे तसेच आवश्यकतेनुसार स्टँडबाय ड्युटीसाठी या वाहनांचा वापर केला जाणार आहे. इलेक्ट्रिकल आगीच्या घटनांमध्येही परिस्थितीनुसार या वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीच्या या फायर बुलेटवर पंप, इंजिन आणि २५ लिटर पाणी साठवण क्षमतेची टाकी बसविण्यात आली आहे. कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याने शहरातील अग्निशमन यंत्रणेला या वाहनांमुळे अधिक सक्षमपणे काम करता येणार आहे.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते आदिल फरास, क्रिडा सभापती विजयसिंह खाडे-पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नगरसेवक विजयसिंह देसाई, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अग्निशमन जवान, व कर्मचारी उपस्थित होते.