no images were found
नाशिकमधील ५५ गावांनीही गुजरातमध्ये सामील होण्यासाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तब्बल ५५ गावांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. गुजरातमध्ये सामील होण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट गुजरात गाठत गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.
महाराष्ट्- कर्नाटक सीमावाद सुरू असताना आता नाशिकमधील काही गावातील गावकऱ्यांनी गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागात ना दळणवळणासाठी रस्ते पोहचलेत, ना वीज, ना पाणी, ना आरोग्य सेवा. शिक्षणाची सुविधा नाही, मोबाईल नेटवर्क नाही, अशा अनेक सुविधांपासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकरी वंचित आहेत. तर २ किलोमीटर अंतरावर गुजरात राज्यातील गावांमध्ये मात्र रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयी सुविधा मिळत असल्यानं या गावकऱ्यांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतलीय.
गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची त्यासाठी स्थापना करण्यात आली असून लवकरात लवकर आमची गावं गुजरातमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघता नाशिकचे जिल्हाधिकारीही थेट सुरगाण्यात पोहचले असून ते इथल्या आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत. जिल्हाधिकारी गावकऱ्यांसोबत पायाभूत सोयी सुविधा आणि विकासकामांबाबत चर्चा करत आहेत. मात्र गावकरी गुजरातमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं या प्रश्नावर तोडगा काढण्यात महाराष्ट्र सरकारला यश येतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.