no images were found
गोकुळ दूध संघाच्या मतदान केंद्र परिसरात निर्बंध लागू : १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून आदेश लागू; जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आदेश
कोल्हापूर, : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) या संस्थेच्या निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान, तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पडावी आणि मतदान केंद्र परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहतील.
या आदेशानुसार मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बूथ उभारणे, प्रचार साहित्य बाळगणे किंवा वापरणे तसेच शासकीय कामासाठी नेमलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट आदी उपकरणे बाळगणे किंवा वापरणे, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मध्ये नमूद केलेली शस्त्रे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी, निवडणूक कामाशी संबंधित कर्मचारी आणि सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नियमानुसार सूट राहील.
मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी किंवा इतर प्रतिनिधींना मोबाईल वापरणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे अथवा मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करण्यास मनाई आहे. मतदान केंद्रात किंवा परिसरात बेशिस्त वर्तन करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, सार्वजनिक सभा किंवा बैठका घेणे, निवडणूक प्रचार करणे तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. पूर्वनियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम तसेच राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना नियमानुसार अपवाद राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये, तर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.