Home Uncategorized महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

4 second read
0
0
7

no images were found

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

कोल्हापूर,  : महिलांच्या समानतेसाठी केवळ कायद्यांची अंमलबजावणी पुरेशी नसून समाजाची मानसिकता बदलणे आणि विषमतावादी मूल्यांविरोधात ठाम भूमिका घेऊन उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामार्फत संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमात ‘भारतीय संविधान व स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर त्या बोलत होत्या. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. देशपांडे म्हणाल्या, भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा अधिकार, संरक्षण आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महिला आज विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत आहेत. मात्र, असे असले तरी महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न अद्याप कायम आहेत. कायदे करूनही समाजाची पुरुषप्रधान मानसिकता बदललेली नाही. आजही महिलांना संपत्तीतील हक्क नाकारणे, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, लैंगिक अत्याचार आणि वेतनातील भेदभाव अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतीमध्ये महिलांचा मोठा सहभाग असूनही जमिनीच्या मालकीमध्ये त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये आचरणात आणली पाहिजेत. समाजातील विषमतावादी व्यवस्थेविरोधात आवाज उठवून संविधानाचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहनही डॉ. देशपांडे यांनी केले. यावेळी त्यांनी भारतीय संविधानाने स्त्रियांसाठी केलेल्या विविध घटनात्मक तरतुदींची माहिती दिली.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, भारतीय संविधानाने स्त्रियांना शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, सामाजिक न्याय, संवेदनशीलता आणि समानता असे महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. मात्र, या अधिकारांची केवळ भाषणांमधून चर्चा न करता दैनंदिन जीवनात त्यांचे आचरण होणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीशी, मग ती कोणत्याही वयाची, जातीची, शिक्षणाची किंवा सामाजिक स्तराची असो, आपण कसे वागतो, यातूनच संविधानाप्रती असलेली आपली बांधिलकी दिसून येते. स्त्री-पुरुष समानता ही केवळ पुरुषांनीच नव्हे, तर स्त्रियांनीही आपल्या वर्तनातून जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘संविधानाच्या मुळाशी कोल्हापूरच्या मातीचा सुगंध’

कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, भारतीय संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित मानवतावादी समाजनिर्मितीचा मूलाधार आहे. संविधानाचे खरे सामर्थ्य त्याच्या तरतुदींमध्ये नसून ते अंमलात आणणाऱ्या व्यक्तींच्या चारित्र्यात आणि आचरणात आहे. संविधानकर्त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान मताधिकार देऊन सामान्य माणसाच्या विवेकावर जो विश्वास व्यक्त केला, तो भारतीय लोकशाहीचा मोठा गौरव आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या मातीत रुजविलेल्या सामाजिक न्यायाच्या विचारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय अधिष्ठान दिले, त्यामुळे संविधानाच्या मुळाशी कोल्हापूरच्या मातीचा सुगंध आहे. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात संविधानातील मूल्यांचे महत्त्व अधिक वाढले असून, हक्कांसोबतच मूलभूत कर्तव्यांची जाणीवही प्रत्येकाने ठेवली पाहिजे. विद्यापीठ हे संविधानाच्या मूल्यांची जिवंत प्रयोगशाळा असली पाहिजे. जात, धर्म, लिंग, भाषा अथवा आर्थिक परिस्थितीच्या आधारावर कोणताही विद्यार्थी दुय्यम ठरता कामा नये. विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि समान संधींचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांना खरी आदरांजली ठरेल.

दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन

या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. कामत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दोन वेगळ्या महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे यांनी लिहीलेल्या ‘बालकांसाठी संविधानाची तोंडओळख’ आणि पुणे येथील नववीतील विद्यार्थिनी अपेक्षा कंदार हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहीलेल्या ‘द बॉय हू आस्क्ड ‘व्हाय?’’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी केंद्राचे संचालक डॉ. पवन गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. कुलवीर कांबळे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, डॉ. हरिष भालेराव, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. शरद गायकवाड, डॉ. राजेंद्र सोनकवडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, संविधानप्रेमी नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे

महिलांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची गरज: डॉ. संबोधी देशपांडे कोल्हापूर,  : महिल…