no images were found
चंदीगड येथे ऑल इंडिया मेयर कॉन्फरन्स; महापौर सौ.रूपाराणी निकम यांची उपस्थिती
कोल्हापूर, : चंदीगड येथील माउंटव्ह्यू हॉटेल, सेक्टर-१० येथे आयोजित ऑल इंडिया मेयर कॉन्फरन्सला कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी उपस्थिती लावली. देशभरातील विविध महानगरपालिका व नगरपालिकांच्या महापौरांनी या परिषदेत सहभाग घेतला.
यावेळी चंदीगडचे महापौर सौरभ जोशी यांनी परिषदेला संबोधित करताना, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ मेयर्स ही देशभरातील महापौरांचा आवाज असून, या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती व अनुभवांची देवाणघेवाण होत असल्याचे सांगितले. चंदीगड हे मॉडेल सिटी म्हणून विकसित झाले असून, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदी क्षेत्रात शहराने केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली.
देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापौरांचा कार्यकाल वेगवेगळा असल्याचा मुद्दाही परिषदेत चर्चेत आला. महापौरांचा कार्यकाळ एकसमान असावा, ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ मेयर्स (उत्तर प्रदेश) चे अध्यक्ष आशुतोष वर्शने यांनी शहरांचा विस्तार होत असताना नागरी समस्यांमध्येही वाढ होत असल्याचे नमूद केले. देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापौरांचा पाच वर्षांचा निश्चित कार्यकाळ असावा तसेच महापौरांची निवड थेट जनतेमधून करण्याबाबत विचार व्हावा असे मत त्यांनी मांडले.
तसेच संविधानातील बाराव्या अनुसूचीमध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नगररचना, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे, पार्किंग, झोपडपट्टी सुधारणा, पर्यावरण संरक्षण आदी महत्त्वाच्या नागरी सेवांचा समावेश आहे.
या परिषदेमुळे देशभरातील विविध महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, नागरी समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती जाणून घेण्याची तसेच परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी महापौर सौ. रूपाराणी निकम यांना मिळाली.
चंदीगडमधील विविध प्रकल्पांची पाहणी
परिषदेच्या समारोपानंतर देशभरातून आलेल्या महापौरांनी चंदीगड शहरातील विविध महत्त्वपूर्ण स्थळे व प्रकल्पांना भेटी दिल्या. यामध्ये इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC), रोज गार्डन, कॅपिटल कॉम्प्लेक्स, एअर म्युझियम, रॉक गार्डन आणि सुखना लेक यांचा समावेश होता. रोज गार्डन येथे महापौरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.