no images were found
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंका
-‘अकॅडमी रिसर्च इंडेक्स’मध्ये ७ संशोधकांना स्थान
-डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्या स्थानी
कोल्हापूर (प्रतिनिधी):- शैक्षणिक संशोधन निर्देशांकातर्फे (Academic Research Index) जाहीर करण्यात आलेल्या २०२६ च्या जागतिक ‘टॉप १००० संशोधक’ क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिन रिसर्चच्या ७ संशोधकांनी जागतिक यादीत मानाचे स्थान पटकावले आहे. ‘एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस’ या विषयात डॉ सी. डी. लोखंडे यांनी जागतिक क्रमवारीत २२ वे, तर देशात प्रथम स्थान पटकावले असून संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी जगात २४ वे तर देशात तिसरे स्थान मिळवले आहे. याशिवाय डॉ. उमाकांत एम. पाटील यांनी ७६ वे स्थान मिळवले असून डॉ. विश्वजीत एम. खोत (३२७), डॉ. जयवंत एल. गुंजकर (५५२), डॉ. अर्पिता तिवारी (५९४), डॉ. पी. पी. पवार (६११) यांनी जागतिक क्रमवारीत स्थान प्राप्त केले आहे.
२०२१-२०२५ या प्रभाव कालावधीसाठी जाहीर झालेल्या या क्रमवारीत ‘एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस’ या संशोधन डॉ सी. डी. लोखंडे यांनी जागतिक स्तरावर २२ वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे, या विषयात भारतातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९९.३८ असून ते जगातील अव्वल ०.२१% संशोधकांमध्ये समाविष्ट झाले आहेत.
विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. प्रमोद एस. पाटील यांनी याच या विषयात जागतिक क्रमवारीत २४ वे स्थान तर भारतामध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९७.८९ असून ते जगातील सर्वोच्च ०.४७% संशोधकांमध्ये स्थान मिळवून आहेत.
डॉ. उमाकांत एम. पाटील यांनीही याच विषयात त्यांनी ७६ वे जागतिक स्थान पटकावले असून भारतात ८ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९४.२६ आहे.
डॉ. विश्वजीत एम. खोत यांनी ‘मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्सचे कॅरेक्टरायझेशन आणि ॲप्लिकेशन्स’ या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत ३२७ वे तर भारतामध्ये ११ वे स्थान मिळवले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.२३ असून ते जगातील टॉप १.७% संशोधकांत समावेश आहे.
डॉ. जयवंत एल. गुंजकर यांनी ‘लेअर्ड डबल हायड्रॉक्साइड्स सिंथेसिस अँड ॲप्लिकेशन्स’ या विषयात ५५२ वे जागतिक स्थान मिळवले असून भारतात २० वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९२.८२ आहे.
डॉ. अर्पिता तिवारी यांनी ‘कार्बन अँड क्वांटम डॉट्स ॲप्लिकेशन्स’ या विषयामध्ये जागतिक स्तरावर ५९४ वे तर भारतात ५५ वे स्थान संपादन केले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.१९ आहे.
डॉ. प्रवीण. पी. पवार यांनी ‘रेडिएशन शिल्डिंग मटेरियल्स ॲनालिसिस’ या विषयात ६११ वे जागतिक स्थान मिळवले असून देशात ७५ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८२.९१ आहे.
जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या या सर्व संशोधकांचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात मिळवलेल्या या यशाबद्दल अतिशय समाधान व्यक्त करत डॉ. पाटील यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आदी उपस्थित होते.
एनर्जी मटेरियल्स, सुपरकॅपॅसिटर्स, नॅनोमटेरियल्स, क्वांटम डॉट्स, रेडिएशन शिल्डिंग आणि प्रगत पदार्थ विज्ञान यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळवलेल्या या जागतिक यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचा नावलौकिक उंचावला असून आंतरविद्याशाखीय संशोधनाला मोठी गती मिळाली आहे.