no images were found
पीएम स्वनिधी अंतर्गत कर्ज प्राप्त फेरीवाल्यांसाठी ले परिचय बोर्डचे वितरण
कोल्हापूर : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAVNidhi) योजनेअंतर्गत महापालिकेने शहरातील पथविक्रेत्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. केंद्र शासनाकडून कर्ज प्राप्त झालेल्या फेरीवाल्यांना व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यासाठी शासन परिचय बोर्ड व प्रधानमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. या परिचय बोर्डाचे वितरण शुक्रवारी प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते कर्ज प्राप्त झालेल्या पथविक्रेत्यांना देण्यात आले. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, व्यवस्थापक निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौंदलगेकर उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAVNidhi) योजना केंद्र शासन मार्फत सुरू करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. कोरोनामुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद राहिल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर भांडवल नसल्याने पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे आव्हान होते. महानगरपालिका राबवीत असलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत महानगरपालिकेने मागील दोन वर्षात ७,३९२ लाभार्थ्यांना बँकेमार्फत तब्बल 9 कोटी 52 लाख रुपये कर्ज दिले आहे. जून २०२० पासून आत्मनिर्भर योजनेला सुरुवात झाली असून यामध्ये ९६२७ फेरीवाल्यांनी कर्जासाठी आलेले अर्ज पात्र झाले आहेत. यामधील ८०६४ इतक्या फेरीवाल्यांना कर्ज मंजूर झाले. तर 7392 इतक्या फेरीवाल्यांना कर्ज त्यांच्या खातेमध्ये जमा झाले आहे. यामध्ये 5404 लाभार्थ्यांना 10 हजार कर्ज घेतले असून १९३५ लाभार्थ्यांनी वीस हजार कर्ज घेतले आहे. पुढील टप्यात 53 लाभार्थ्यांनी 50 हजार कर्ज घेतले आहे. या सर्व योजनेमधून ९ कोटी ५२ लाख इतके कर्ज महापालिकेने वितरीत केले आहे.