no images were found
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी वसुलीवर विशेष लक्ष द्या : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासह अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्प; नवीन ४० ई-बसेस गर्दीच्या मार्गांवरून फिरविण्याच्या सूचना
कोल्हापूर, : महापालिकेच्या उत्पन्नात यावर्षी १०० ते १५० कोटी रुपयांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवून वसुली प्रक्रियेला गती द्यावी. फेरीवाले, परवाना, घरफाळा, पाणीपुरवठा व इस्टेट विभागांच्या थकबाकी वसुलीसह केलेल्या कारवाईचा नियमित आढावा घ्यावा. तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती सर्व सहायक आयुक्तांनी दर आठवड्याला सादर करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिल्या. आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच सीएसआरच्या माध्यमातून आणखी ५ हजार दिवे बँकांच्या सहकार्याने उपलब्ध करून घेण्यासाठी कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या नवीन धोरणानुसार पुढील काळात परवाना तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने फेरीवाल्यांना क्यूआर कोड व परवाना देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करावेत. अधिकृत नोंदणीकृत ५ हजार ८०० फेरीवाल्यांची कागदपत्रे दिनांक ६, ७ व ८ ऑक्टोबर रोजी आयोजित विशेष कॅम्पमध्ये घ्यावीत. यापैकी ८० टक्के काम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
चारही विभागीय कार्यालयनिहाय सर्व सहायक आयुक्तांनी वसुलीचा आढावा घेऊन पुढील बैठकीत अद्ययावत आकडेवारी सादर करावी. फेरीवाले, परवाना, घरफाळा, पाणीपुरवठा व इस्टेट विभागाची थकबाकी, झालेली वसुली, करण्यात आलेली कारवाई, तपासणीच्या नोटिसा तसेच थकीत रक्कम यासह सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेने परवाना दिलेल्या केबिनव्यतिरिक्त अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या केबिनवर धडक कारवाई करावी, असेही आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले.
नवीन ४० इलेक्ट्रिक बसेस शुक्रवारपर्यंत गर्दीच्या मार्गांवर धावल्या पाहिजेत अशा सूचना देताना नागरिकांना अधिक चांगली सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. महापालिकेच्या अंतिम टप्प्यातील सर्व प्रकल्पांचे ऑडिट करून शहर अभियंता तसेच संबंधित आवश्यक विभागांचा अभिप्राय घेऊन प्रकल्पाची मंजूरी अंतीत टप्यावर आणावी. वर्कऑर्डर व मंजुरी झालेल्या कामांचे ऑडिट पूर्ण करून कार्यादेश देण्यात पर्यंतच्या सर्व बाबी तत्काळ पूर्ण कराव्यात. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर लगेच वर्कऑर्डर देऊन कामे सुरू करता येतील, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता यांनी दर आठवड्याला चारही उपशहर अभियंत्यांसोबत मंजूर कामांचे ठेकेदार तसेच कामे सुरू केलेल्या ठेकेदारांची बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा. मंजूर झालेली सर्व कामे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असेही आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार पद्मल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, कर निर्धारण व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विद्युत अभियंता अमित दळवी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह राजपूत, रावका अधिकारी सुनील बिद्रे, प्रशांत पंडत आदी उपस्थित होते.